सध्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ५ फेब्रुवारीला सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली अगदी तेव्हापासून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहेत. सध्या चित्रपटांचे सिक्वेल मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. अशातच नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वलही तब्बल १९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला दिसत आहे. येत्या २० सप्टेंबरपासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धमाकूळ घालायला सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर समोर आला आहे. (Navra Maza Navsacha 2 teaser)
२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षकवर्ग पाहतो. चित्रपटातील गाणी, डायलॉग, भूमिका यांवर मराठी रसिक प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतो. अशातच आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट येणार असल्याचं कळताच प्रेक्षकांचा एक वेगळाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आता हा प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करायला चित्रपटाचा टिझर समोर आला आहे.
‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात आपण एसटीचा प्रवास अनुभवला मात्र, आता या प्रवासात ट्विस्ट असणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा भाग २’ मध्ये कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. तर, अशोक सराफ यावेळी बस कंडक्टर नव्हे तर टीसी म्हणून पेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये कोकण रेल्वेने सुरु झालेला हा गणपती पुळे पर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. सरकारी तिजोरीतून हरवलेले हिरे, ते दोन चोर, हरवलेली मूर्ती आणि कोकण रेल्वेतून रत्नागिरी पर्यंतचा प्रवास याभोवती फिरणार विनोदी कथानक टिझरमध्ये पाहायला मिळत आहे.
अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हेमल इंगळे, विजय पाटकर ही कलाकार मंडळी त्यांच्या विनोदी अंगाने चित्रपटात धुडगुड घालणार असल्याचं दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २० सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज होत आहे.