‘बिग बॉस’च्या घरातील वाद हे आता काही नवीन राहिलेले नाहीत. या घरात दररोज कुणाचं ना कुणाचं तरी भांड्याला भांडलं लागतच आहे. त्यातच पहिल्या आठवड्यात निक्की आणि वर्षा उसगांवकर यांचा राडा झाल्यानंतर रितेशने तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी आणि वर्षा उसगांवकर यांच्या राड्याची चर्चा झाली. याबद्दल अनेक कलाकार आपली मतं व्यक्त करत आहेत. जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मेघा धाडे यांसारख्या अनेक कलाकारांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. अशातच अभिनेते अंशुमन विचारेने आपलं मत व्यक्त केलं आहे. इट्स मज्जाच्या मज्जाचा अड्डा या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी बिग बॉस मराठीकया नवीन पर्वाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “‘बिग बॉस’च्या घरातील राडे पाहून माझी खूप चिडचिड होते. आपल्याच मराठी कलाकाराबरोबर असं वागलं जात आहे. त्यांची रणनीती काय आहे त्यांचे नियम काय आहेत हे मला माहीत नाही. पण वर्षा उसगांवकर या खूप ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांचा अपमान होत असताना बाकीचे कलाकार गप्प का? घरातील सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सोडून द्या. पण कलाकारांनी याबद्दल त्यांची भूमिका व्यक्त केली पाहिजे होती. तुम्ही बाकी काहीही बोला पण एका ज्येष्ठतेचा मान राखला पाहिजे. पण हे बाकीचे काहीच बोलले नाहीत. त्यामुळे मला वाटतं की ‘बिग बॉस’ची ट्रॉफी ही माणूस आणि माणुसकीपेक्षा कुणी तरी मोठी असणार. म्हणून हे भिकाऱ्यासारखं करत आहेत. मी भिकाऱ्यासारखं बोललो कारण ही लाज घालवणारी गोष्ट आहे. आपण संस्कारी माणसं आहोत. आपण महाराष्ट्रीयन लोक संस्कारांबद्दल बोलतो, मग आता कुठे गेले संस्कार?, बोलायला पाहिजे ना?”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नवीन पाहुण्याची एण्ट्री होणार, कोण असणार ‘ती’ व्यक्ती? गाणं वाजलं अन्…
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यामुळे फार फार काय होईल तर काढून टाकतील. काढू दे ना मग? आपण माणूस लोकांसमोर म्हणून चांगले राहून ना. केवळ ती ट्रॉफी आणि त्या घराट राहण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाणार का? मला नाही पटत”. यापुढे अंशुमनने पॅडी म्हणजेच पंढरीनाथ यांचा उल्लेख करत असं म्हटलं की, “मला पॅडीचाच राग आला. निक्कीला तो शाब्बास म्हटला. तिचं कौतुक केलं. अरे काय बोलतो आहेस तू? म्हणजे तुला तिथे राहायचं आहे का? माणूस म्हणून नक्की कसा आहेस तू? यामुळे आम्ही तुला ओळखलं नाही का? हा विषय येतो. मी सारखं माणुसकीवर येतो. कारण आपण आता खूपच खालच्या थराला जात आहोत. माझं म्हणणं आहे तुम्ही प्रगती करा, पैसे कमवा पण याला काहीतरी मर्यादा ठेवा”.
दरम्यान, अंशुमन विचारे यांनी त्यांना बिग बॉसबद्दल विचारणा झाली असून याबद्दल त्यांनी असं म्हटलं की “माझा हा पिंड नाही. मी पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर पडेन. माझ्या आकलन शक्तीच्या पुढे आहे हे सगळं.” तसंच त्यांनी रीलस्टारबद्दल असं म्हटलं की, “मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे” असं म्हटलं आहे.