सिनेसृष्टीत स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. ज्यात त्यांनी दिवंगत सुपरस्टार राज कुमार यांच्याबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. मुकेश खन्ना यांनी राज कुमार यांच्यासह घालवलेला काळ आणि ६०-७० च्या दशकातील अनेक मनोरंजक गप्पा सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल एक घटनाही सांगितली. मुकेश खन्ना यांनी सांगितले की, राज कुमार यांनी आपला कर्करोग चित्रपटसृष्टीपासून लपवून ठेवला होता आणि कोणालाही कळण्यापूर्वीच त्यांचे अंतिम संस्कार व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. (Raaj Kumar incident)
‘पाकीजा’, ‘हीर रांझा’, ‘तिरंगा’, ‘सौदागर’, ‘वक्त’ असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या राज कुमार यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले. ते त्यांच्या खास संवाद बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. इतकंच नाही तर इतर अभिनेत्यांबरोबरच्या त्यांच्या स्पष्टवक्ते शैलीचे अनेक किस्सेही खूप गाजले. पण इंडस्ट्रीत त्यांच्या मृत्यूची बातमी पसरण्यापूर्वीच त्यांचे अंतिम संस्कार व्हावेत अशी राज कुमार यांची इच्छा होती.
याबाबत मुकेश खन्ना यांनी ‘बॉलिवूड बबल’ला सांगितले की, राज कुमार हा इतका खासगी व्यक्ती होता की त्याने आपल्या कॅन्सरची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली होती. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीला याची माहिती येण्यापूर्वीच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. त्याच्या अंत्यसंस्काराला कोणी यावे असे त्याला वाटत नव्हते. राज कुमार यांचे १९६९ साली निधन झाले.
मुकेश खन्ना यांच्या म्हणण्यानुसार, राज कुमार यांनी एकदा राजेश खन्ना व जितेंद्र यांची तुलना ज्युनियर कलाकारांशी केली होती. मुकेश खन्ना म्हणाले, ‘एकदा राज कुमार सेटकडे जात असताना त्यांनी राजेश खन्ना, जितेंद्र व इतर काही कलाकार तिथे उभे असलेले पाहिले. मग तो दिग्दर्शकाकडे गेला आणि म्हणाला की, “तुम्ही अनेक ज्युनियर आर्टिस्ट गोळा केले आहेत”. चार दशकांच्या कारकिर्दीत, राज कुमार यांनी ७० चित्रपटांमध्ये काम केले आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्समध्ये त्यांची गणना होते. चित्रपटात येण्यापूर्वी ते मुंबई पोलिसमध्ये होते. १९५२ मध्ये त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.