टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. निखिल पटेलबरोबरच्या वैवाहिक आयुष्यामुळे ती गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होती. त्यांनतर दोघांनी हे नातं संपवलं असून दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचवेळी अभिनेत्रीने निखिल पटेलवर फसवणुकीचा आरोप केला होता, तर निखिल पटेलनेही स्वतःचा बचाव करत अभिनेत्रीने केलेला दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता निखिल त्याच्या कथित मैत्रिणीसह मुंबईला पोहोचला, ज्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. (dalljiet kaur reacts on nikhil patel)
‘टेली टॉक’ने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये निखिल पटेल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर दिसत होता. त्याच्या पोस्टनुसार या महिलेचे नाव सफिना नजर आहे. निखिल पटेल १ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची गर्लफ्रेंड सफिना नजरबरोबर फिरायला मुंबईत आला आहे. या फोटो व व्हिडीओमध्ये निखिल व सफीना मिठी मारताना दिसत होते. दलजीतने इन्स्टास्टोरीवर ही पोस्ट शेअर करत लिहिले, “कोणतेही शब्द नाहीत, फक्त अश्रू आहेत जे थांबत नाहीत”. हा फोटो व्हायरल होताच लोक निखिलवर टीका करत आहेत आणि त्याला ट्रोल करत आहेत. तर निखिलच्या या वागणुकीवर अनेकजण दलजितला पाठिंबा देत आहेत.

दलजीत कौरने २०२३ मध्ये केनियातील बिझनेसमन निखिल पटेलसह दुसरे लग्न केले होते. लग्नाच्या १० महिन्यांनंतरच ही अभिनेत्री भारतात परतली आणि त्यानंतरच या दोघांचे लग्न मोडल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. अभिनेत्रीने निखिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत हे फोटो समोर आल्यानंतर याची पुष्टी झाली आहे. यावर निखिलकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, दलजीतचं वैयक्तिक आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं होतं. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भनोटशी झालं होतं, पण काही वर्षात ते दोघेही विभक्त झाले. त्यांना जेडन नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर तिची व निखिलची भेट झाली व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत. आता निखिलच्या या वागणुकीनंतर अनेकजण त्याला दोषी ठरवताना दिसत आहेत.