Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. शोचा विजेता ठरण्यासाठी, टास्क जिंकण्यासाठी शह-कटशह, ठस्सन सुरु झाली आहे. यंदाच्या पर्वात वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. यापैकी सूरजच्या एण्ट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde on suraj chavan)
‘बिग बॉस’च्या घरातील सूरज चव्हाणच्या एण्ट्रीबद्दल उत्कर्ष शिंदेने भाष्य केलं आहे. सूरजचा या घरात आल्यानंतरचा नवीन स्वॅग पाहायला मिळत आहे. सूरजच्या नवीन स्वॅगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमध्ये तो आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्याच्या याच स्टाईलबद्दल उत्कर्षने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उत्कर्षने सूरजचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, सूरज तू मोठमोठ्या संकटांना हरवून इथपर्यंत आला आहेस. तू सच्चा आहेस. बाकी स्पर्धकांसारखं चेहरे बदलणारा नाहीस. शिकलेल्यांना माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हेच आठवत नसेल तर त्यांचं शिक्षण चुलीत घाला” तसेच यापुढे त्याने इतर स्पर्धकांना उद्देशून तूम सीरफ डरा सकते होण हरा नही सकते”.

काही दिवसांपूर्वी उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने असं म्हटलं होतं की, “कंटस्टंट (स्पर्धक) छान किंवा वाईट ठरवण्यात मज्जा नाही. हा (सुरज चव्हाण) असाच रॉ, फ्री, मोकळा, निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना याला सांभाळायचं कसं हे कळणार नाही. त्यामुळे सुरज बिग बॉसमध्ये मज्जा आणेल. हे रसायन वेगळं आहे”.
त्यामुळे यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन:श्याम दराडे यांचा समावेश आहे. त्यामुळे या घरात आता कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने ‘बिग बॉस’च्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज आता त्याची काय नवीन चाल खेळणार? त्याच्या नवीन शैलीने तो या खेळात काय रंगत आणणार? हे आगामी भागांमधून पाहायला मिळणार आहे.