‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’चे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. येत्या २८ तारखेपासून याचे नवे पर्व सुरु होणार आहे. नव्या पर्वाचे विविध प्रोमो प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवत आहेत. ‘बिग बॉस’च्या या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख साकारणार आहे. या खेळात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवरुन या खेळात कोणते स्पर्धक दिसणार या हिंटवरुन प्रेक्षकांनी अनेक नाव सुचवली. (Shubhankar Tawde On Bigg Boss)
यंदाच्या या पर्वात अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा होत आहे. यामध्ये एका अभिनेत्याचं नाव विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. आता खुद्द या अभिनेत्यानेच त्याच्या पोस्टमधून याबाबतची मोठी हिंट दिली आहे. हा अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे. कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. ‘वेड लावणारं प्रेम तर त्याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?’, असा सवाल या प्रोमोद्वारे करण्यात आला होता आणि या प्रोमोच्या बॅकग्राउंडला ‘वेड’ सिनेमातील ‘वेड लावलंय’ हे गाणे वापरण्यात आलं.

‘वेड’ या सिनेमात शुभंकर तावडेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यामुळे शुभंकरच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्याने लेटेस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमधून असाच इशारा केला आहे की, २८ जुलैपासून तो ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये दिसू शकतो. “हा सीझन काहीतरी वेगळा असणार आहे. मी पावसाबद्दल बोलतो आहे की आणखी काहीतरी वेगळे आहे? जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे”, असं त्याने पोस्टद्वारे म्हटलं आहे.
मात्र या पोस्टमधील इंग्रजी वाक्य त्याने असे लिहिले आहे की, “Whatever it is I will bb definitely going somewhere “, या वाक्यातील Be या शब्दाच्या जागी त्याने bb असा शब्द वापरला आहे, शिवाय त्याने त्याच्या वाक्यात सीझनचाही उल्लेख केला आहे. यावरुन शुभंकर ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनमध्ये दिसेल हे यावर शिक्का मोर्तब झालं आहे.