आज आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. सर्वजण आज हरिनामाच्या नामस्मरणात दंग आहेत. आज प्रत्येक भाविक आपल्या परीने विठुरायाची आराधना करत आहेत. पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याचे डोळे आसुसलेले असतात. सामान्य वारकऱ्यांसह अनेक कलाकारही या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जात असतात. अशातच ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकरांनी देहू व आळंदी येथे दर्शन घेतले.
छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत आदेश बांदेकर हे अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आहेत. रंगभूमी, ‘होम मिनिस्टर’ आणि याशिवाय अनेक राजकीय कार्यक्रमांनिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. यादरम्यान त्यांना येणारे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे देहू व आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या दर्शनाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आदेश बांडेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे देहू व आळंदी येथील दर्शनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर दर्शनासाठी गेले असताना अनेक चाहत्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. यावेळी अनेक चाहते मंडळी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी पुढे येत होते आणि आदेश यांनी प्रत्येक चाहत्याला सेल्फी फोटोही दिला. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत आहे. यावेळी गाभाऱ्यात त्यांनी विठूरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी विठूरायाचरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वादही घेतले.
आणखी वाचा – नोकरदारांसाठी बुधवारचा दिवस आहे फायद्याचा, व्यवसायिकांनाही मिळणार आर्थिक नफा, जाणून घ्या…
आदेश यांनी देहू येथील तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा व्हिडीओही शेअर केला आहे. यावेळी दर्शन घेतल्यानंतर ते भजनामध्येही हरपून गेले. त्यानंतर आदेश बांदेकरांनी देहू येथे अन्नदान सेवाही केली, मंदिरातील उपस्थित भाविकांसाठी त्यांनी अन्नदान केलं. आदेश बांदेकरांनी आजच्या एकादशीनिमित्त त्यांच्या दर्शनाचा हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे.