मराठी सिनेसृष्टीतील अफाट लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या अभिनेत्याला वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण ‘लक्ष्या’ या नावानेच आजही बोलतात. कारण हा अभिनेता सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटतो. ते त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळेच लोक लक्ष्मीकांत यांचा एकेरी उल्लेख करतात. लक्ष्मीकांत यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतला. पण चाहत्यांच्या मनात ते आजही जीवंत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात आणि त्यामुळे लक्ष्मीकांत यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या याच लोकप्रियतेबद्दल त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डेने एक किस्सा सांगितला आहे. सध्या त्यांचा मोठा मुलगा अभिनय बेर्डे हा आता फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय झाला आहे. अभिनयने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या लोकप्रियतेचा किस्सा सांगितला आहे.
यावेळी त्याला चाळीच्या आठवणीबद्दल विचारण्यात आले. त्याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं की, “आम्ही पूर्वी चाळीत राहायचो. पण नंतर आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. कारण वडील तिथे राहू शकत नव्हते. एका ठरावीक वेळेनंतर त्यांना तिथे राहणं शक्य झालं नाही. कारण लोक त्यांना त्रास द्यायचे. ‘धुमधडाका’ आल्यानंतर त्यांची लोकप्रियता जास्त वाढलेली. मला आठवतं घरात गणपती होता तेव्हा आमच्या घरातल्या गणपतीमध्ये साधारण १०० माणसं दररोज जेवायला असायची. कारण त्यावेळी अनेक कुटुंब एकत्र राहायचे. तार ‘धूमधडाका’ रिलीज झाल्यानंतर पप्पांना पाहण्यासाठी इतकी गर्दी जमा झालेली की, त्यांना एकदा टाकीवर बसावं लागलं होतं”.
आणखी वाचा – “आईचं निधन झालं आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाला, “मी गावी गेलो अन्…”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझे जे दोन भाऊ आहेत ते अजूनही तिथेच राहतात. ते त्यावेळी पप्पांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी बॅरिगेट्स घेऊन खाली उतरायचे. मग कालांतराने घर शिफ्ट करावं लागलं. तेव्हा मी नव्हतो. ८० च्या दशकातली ही गोष्ट आहे. नंतर आमचा गणपती तिथेच जायचा. माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती असायचा आणि मग पाच दिवसाचा त्या घरी असायचा. थोड्या दिवसांनी तिथेही दीड दिवसाचा केला. त्यानंतर आम्ही आमच्या घरचा गणपती आणायचा थांबवला आणि आमच्या घरी आता फिरता गणपती असतो”.