लोकप्रिय मराठी रिऍलिटी शो ‘बिग बॉस सिझन ५’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा ‘बिग बॉस मराठी’चा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या रिऍलिटी शोचे याआधीचे चारही सिझन विशेष गाजले. या चार सिझनच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांनी सांभाळली. मात्र आता पाचव्या सिझनची धुरा महेश मांजरेकर नव्हे तर सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. या पर्वात नेमके कोणते कलाकार झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Bigg Boss Marathi Season 5)
नव्या पर्वातील स्पर्धकांसह पाचव्या सिझनची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. यानानंतर काही वेळापूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा आणखी एक नवा प्रोमो व्हायरल झाला. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सूट घालून रितेश देशमुख पुणेरी ढोल वाजवताना दिसतो आहे.
“होणार ढोलताशांचा गजर, सळसळणार उत्साहाची लहर! आज संध्याकाळी जाहीर होणार बिग बॉस मराठीची ‘तारीख’. मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी” लवकरच. “फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर”, असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं होतं. यानंतर आता हा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार या प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे. हा सिझन आता २८ जुलै या तारखेला रात्री ९ वाजता साऱ्यांच्या भेटीस येणार आहे.
कलर्स मराठीने ‘बिग बॉस मराठी’ची तारीख जाहीर करताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’मराठीमध्ये नेमके कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.