‘झी मराठी’वरील ‘शिवा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका ठरली आहे. या मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरत आहे. शिवा व आशु यांचा संसार मालिकेत सुरु झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आशुबरोबर दिव्याचं लग्न होणार होतं. मात्र आयत्यावेळी दिव्या भर मंडपातून पळून जाते. त्यामुळे भाऊंच्या आग्रहाखातर दिव्याच्या जागी शिवा उभी राहते. त्यामुळे शिवाचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलेलंही पाहायला मिळालं. (shiva fame srushti bahekar)
मालिकेत दिव्या ही भूमिका अभिनेत्री सृष्टी बाहेकर साकारत आहे. मालिकेतील ही दिव्या नेहमीच अरेरावी करणारी, स्वार्थी, स्वतःच खरं करणारी आहे. मात्र खऱ्या आयुष्यात दिव्या नेहमी कशी आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. इतकंच नव्हे तर दिव्या तिच्या खऱ्या आयुष्यात अभिनय नाही तर वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहे. सोशल मीडियावरही सृष्टी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
मालिकेतील नकारात्मक भूमिकेत दिसणारी दिव्या ही खऱ्या आयुष्यात पेशाने डॉक्टर आहे. डॉ. सृष्टी बहेकर ही शिवा मालिकेत दिव्याची भूमिका साकारत आहे. व्यवसायाने दंतचिकित्सक आणि मनापासून अभिनेत्री व नर्तिका असलेल्या सृष्टीला लहानपणापासूनच टेलिव्हिजनची आवड होती. तेव्हापासूनच तिने ठरवलं होतं की मोठे झाल्यावर आपण टीव्हीवर यायचं. पण शालेय शिक्षणात हुशार असल्याने सृष्टीने कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला. डान्सचे क्लास, नाटक अशा माध्यमातून तिने कलेची आवड जोपासली. शेवटच्या वर्षात शिकत असतानाच सृष्टीला ‘इंडिया के मस्त कलाकार’ या सोनी टीव्हीच्या रिऍलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली. आणि या माध्यमातून तिचे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.
‘बैस ना ऐक ना’ या गाण्यात सृष्टीला प्रमुख भूमिका मिळाली. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेनंतर सृष्टी आता ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेमुळे तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळताना दिसत आहे. दिव्याची भूमिका ही विरोधी असल्याने सृष्टीला नक्कीच प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागते पण खऱ्या आयुष्यात ती लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरवते, हे ही तितकेच खरे आहे.