‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. मात्र तितक्यात नेत्रा सावध होते आणि तिला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. यामुळे ती धावत रुपालीच्या खोलीत जाते आणि रुपाली वाजवत असलेल्या वीणाची तार तोडते. अशातच आजच्या भागात नेत्राने वीणाची तार तोडताच ती वीणा नष्ट होते. यानंतर रुपाली व नेत्रा एकमेकींकडे रागाने बघत एकमेकींचा गळा पकडतात.
मग अद्वैत, इंद्राणी व शेखर त्या दोघींना सोडवतात. त्यानंतर नेत्रा अद्वैत आपल्या खोलीत येताच अद्वैत नेत्राला त्याच्या प्रतिबिंबाने काही केले तर नाही ना असं विचारतो. तेव्हा नेत्रा प्रतिबिंबाने तिच्या पोटावर हात ठेवून कोणता तरी मंत्र म्हटल्याचे सांगते. मग अचानक तिच्या पोटात कळा सुरु होऊ लागतात. तेव्हा इंद्राणीदेखील तिथे येते आणि तिला नक्की काय झालं याबद्दल विचारते. इंद्राणीलादेखील नेत्रा तेच सांगते की अद्वैतच्या प्रतिबिंबाने तिच्या पोटावर हात ठेवुन कोणता तरी मंत्र म्हटला आहे.
पुढे रुपाली त्या प्रतिबिंबाने म्हटलेला तो मंत्र ऐकू आला मग पुढे काय झालं? असा विचार करत असताना तिला विरोचक दिसतो. जो तिला “निश्चिंत राहा, तुझं काम झालं आहे. नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही. त्रिनयना देवीच्या लेकीच्या पोटात असताना आणि पोटातून बाहेर आल्यानंतरदेखील तो विरोचकाचाच अंश असणार आहे. तसेच तो विरोचकासाठीच काम करेल” असं म्हणतो. यानंतर दोघी मोठमोठ्याने हसू लागतात.
पुढे नेत्रा-अद्वैत डॉक्टरांकडे जातात. तेव्हा ते नेत्राला तपासताना त्यांना काहीतरी वेगळंच असल्याचे दिसून येते. नेत्राच्या तपासणीदरम्यान त्यांना असं आढळून येतं की, नेत्राच्या पोटात बाळ एकच आहे मात्र हृदयाचे दोन ठोके ऐकू येत आहेत. यामुळे नेत्रा-अद्वैत दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे आता त्रिनयना देवीच्या लेकी या नवीन संकटाचा सामना कसा करणार? देवी त्यांना साथ कशी देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.