धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर गारुड घातले. अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तूफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाची चाहूल प्रेक्षकांना देण्यात आली होती. तेव्हापासून अनेक चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर-२’ची घोषणा करण्यात आली होती.
नुकतंच या चित्रपटाचे दुसरं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर हा सोहळा पार पडला. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे आणि बॉबी देओलदेखील उपस्थित होते. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हा टीझर शेअर केला आहे. ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’ असं कॅप्शन लिहिलेल्या या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
या टीजरमध्ये एक मुस्लिम महिला राखी बांधायला आनंद दिघेंकडे येते. तेव्हा ते तिला बुरखा काढायला सांगतात. त्यानंतर ती महिला चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं त्यांना कळतं. यानंतर आनंद दिघे संतापतात आणि राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त बहिणींना घेऊन ते त्या महिलेच्या घरी जातात. त्याचवेळी आनंद दिघे त्यांच्या खास शैलीत “ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की” हा संवाद म्हणतात. अंगावर काटा आणणाऱ्या या टीझरमधून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची झलक पाहायला मिळते.
दरम्यान, ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंचं जीवनचरित्र दाखवलं होतं. त्यानंतर आता ‘धर्मवीर-२’ मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार आहे. त्यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. पोस्टरमध्ये ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.