गेले काही दिवस मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांच्या तब्येतीबद्दलच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल कळताच चाहत्यांमध्येदेखील काळजीचे वातावरण आहे. नुकतीच अभिनेत्री हिना खाननेदेखील तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे सांगितले. तिच्या या आजाराच्या बातमीनंतर आता बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरदेखील एका दुर्मिळ आजाराचा शिकार झाल्याची माहिती समोर आली आहे. करण जोहर गेली अनेक वर्ष शारीरिक समस्यांचा सामना करत आहे. करणनं त्याला असलेला आजार स्वीकारला असून तो त्यासाठी स्वत: काळजी घेत आहे. करणचा आजार असा आहे की ज्यामुळे त्याला ओव्हरसाइज कपडे परिधान करावे लागतात.
करण जोहरला बॉडी डिस्मॉर्फिया हा आजार झाला आहे. या आजारामुळे करणला ओव्हरसाइज (शरीरापेक्षा मोठ्या आकाराचे) कपडे घालावे लागतात. स्वत: करणने त्याच्या या आजाराबद्दल सांगितले आहे. करण जोहरने सांगितले की तो वयाच्या आठव्या वर्षापासून बॉडी डिसमॉर्फिया या आजाराशी लढत आहे. करणच्या आजाराला तब्बल ४४ वर्षे झाली आहेत. करण जोहर आता ५२ वर्षांचा आहे.
केवळ ८ वर्षांचा असताना त्याला हा आजार झाला होता. करण गेल्या ४४ वर्षांपासून या आजाराबरोबर जगत आहे. करण जोहरने अलीकडेच ज्येष्ठ पत्रकार फेस डिसूझा यांच्याशी या आजारावर चर्चा केली. करणने फेस डिसूझासमोर खुलासा केला की, त्याला नेहमीच वाईट दिसण्याची भीती वाटते. याशिवाय करण जोहरला त्याच्याबद्दल लोकांचे मत काय असेल याचीही चिंता आहे.
तसेच त्याने “मला बॉडी डिस्मॉर्फियामुळे मला स्वीमिंग पूलमध्ये जाताना खूप अस्वस्थता जाणवते. मी यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही”. असं म्हटलं. करण जोहर पुढे म्हणाला, “मी नेहमीच ओव्हरसाइज कपडे परिधान करतो. मी कितीही वजन कमी केलं तरीही मला असं वाटतं की मी जाड आहे. त्यामुळे मी नेहमी माझंच बॉडी शेमिंग करत असतो. माझ्या शरिराचा कोणताही भाग कोणी पाहावा असं मला वाटत नाही. त्यामुळे मी नेहमी ओव्हरसाइज कपडे वापरतो”.