प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असतं की त्यांचं मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं. मुंबई ही कलाकारांसाठी एक स्वप्ननगरीच आहे. खेड्यापाड्यातून वा विविध शहरांमधून ही कलाकार मंडळी मुंबईमध्ये येत त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास सुरु करतात. घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून रुपाली घराघरात पोहोचली. गेली अनेक वर्ष रुपाली संजना हे पात्र साकारत असून तिच्या या पात्रांने प्रेक्षकांच्या मनात घर केला आहे. (Rupali Bhosale New Home)
मालिकेत खलनायिका असणारी रुपाली खऱ्या आयुष्यात मात्र फारच लोभी व गोड आहे. सोशल मीडियावरही रुपाली बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच रुपालीने मुंबईत नवं घर घेतलं असून या घरात गृहप्रवेश केला असल्याचं समोर आलं आहे. यावेळी तिने सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनाही आमंत्रित केलं असल्याचं पाहायला मिळालं. रुपालीच्या नव्या घरात वास्तुशांतीची पूजा ठेवण्यात आली होती. या निमित्त अनेक कलाकार मंडळीनी हजेरी लावत तिला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये रुपालीच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. वास्तुशांती पूजा केलेलीही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रुपालीच्या नव्या घरातील पूजेच्या वेळी टाळ मृदुंगाच्या तालावर भजनात दंग झालेल्या कलाकार मंडळींना पाहणं फारच औत्स्युक्याचे ठरत आहे. नवं घर घेतलं असल्याचा आनंद रुपालीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर या आनंदात भजनाच्या तालावर रुपालीनेही ठेका धरलेला पाहायला. तसेच गौरी कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, अभिजीत केळकर ही कलाकार मंडळीही या भजनाच्या तालावर ठेका धरत दंग झालेली दिसली.
काल T20 विश्वचषक सामनाही होता. तर अभिजीत केळकर यांनी रुपालीच्या कुटुंबियांसह या मॅचचा आनंदही रुपालीच्या नव्या घरात लुटला. “मराठी सिने कलावंत अभिजीत केळकरबरोबर भारतीय संघ T20 विश्वविजेता झाल्यावर अभिनेत्री रूपाली भोसलेच्या नुतन निवासस्थानी गृहप्रवेश निमित्त उपस्थित असताना एकच जल्लोष केला”, असं कॅप्शन असणारा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.