“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राला हसायला भाग पाडणारा अभिनेता व लेखक डॉ. निलेश साबळे याने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळे त्याचा नवाकोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ नंतर संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी तो ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ हा नवीन घेऊन आला आहे.
निलेश साबळेच्या लेखनाचे व अभिनयाचे अनेक चाहते आहेत. मात्र तो एक उत्तम डॉक्टरदेखील आहे, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. अशातच त्याची एक आणखी एक बाजू प्रेक्षकांसमोर आली आहे, ती म्हणजे मेकअप मॅनची. निलेश साबळे सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपल्या कामासह अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियाद्वारे पडद्यामागील काही मनोरंजक गोष्टीही शेअर करत असतो. अशातच त्याने त्याचा व भाऊ कदमचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
डॉ. निलेश साबळेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भाऊ कदमचा मेकअप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश साबळे भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा मेकअप करताना पाहायला मिळत आहे. निलेश साबळे या व्हिडीओमध्ये दोघांना मिशी काढत आहे. एका स्किटसाठी तयार होत असताना भाऊ व ओंकार यांनी वेशभूषा केलेली आहे. मात्र त्यांच्या रंगभूषा करण्याची जबाबदारी निलेश साबळेने घेतली आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिला स्पर्धक घराबाहेर, सुप्रसिद्ध स्पर्धकाची आश्चर्यकारक एक्झिट
दरम्यान, “मनोरंजन हे असं क्षेत्र आहे, ज्यातलं सगळच मला आवडतं” असं म्हणत निलेश साबळेने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे?’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळत आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे.