कलाकारांचं त्यांच्या चाहत्यांबरोबर खास बॉण्ड असलेलं बरेचदा पाहायला मिळालं आहे. कलाकारांचे असे काही चाहते आहेत जे कायम त्यांच्या आठवणीत राहतात वा आठवणीत राहणारे क्षण त्यांना देत असतात. तसेच ते त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला न चुकता हजेरी लावत त्यांच्या कलेला दुजोरा देताना दिसतात. कलाकार आणि चाहते यांच्यातील अनोखं बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. चाहते मंडळींमुळे हे कलाकार अधिक लोकप्रिय होतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच एका चाहत्यासाठी एका कलाकाराने केलेल्या खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Subodh Bhave On His Fan)
अभिनेता सुबोध भावे याने आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सुबोध नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुबोधने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेषतः तो सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच सुबोधने त्याच्या चाहतीसाठी केलेल्या एका भावुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सुबोधची एक चाहती म्हणजेच इरावती कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. इरावती कुलकर्णी या चाहतीच्या निधनानंतर सुबोधने भावुक पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “आपल्या कामावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिक व्यक्तीचं जाणं हे फार चटका लावणार असतं. इरावती तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. यापुढे कायम एक खुर्ची रिकामी असेल”, असं म्हणत तो भावुक झाला आहे. इरावती या सुबोधच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या.
आजवर त्यांनी सुबोधच्या बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावत त्याच्या कलेला दाद दिली आहे. एखाद्या नाटकाचं रंगीत तालीम असो वा नाटक असो त्या वेळोवेळी त्या आपल्या आवडत्या नटाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असायच्या. इरावती कुलकर्णी यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही सुबोधचे अनेक फोटो आणि त्याच्या कामाला दिलेला दुजोरा पाहायला मिळत आहे. सुबोधच्या कामावर निस्सीम प्रेम करणाऱ्या एका रसिकाच्या निधनाने अभिनेत्यालाही दुःख अनावर झालं आहे.