मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेचा साहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदे याचा मृत्यू झाला आहे. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी गौरवचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसला धडक दिल्याने गौरवला गंभीर दुखापत झाली होती. वाकोला पुलाजवळ ही घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी गौरवला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास १० दिवस गौरव आयसीयूमध्ये होता. मात्र गौरव हा मृत्यूचा लढा लढण्यात अपयशी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. सिनेविश्वात गौरवच्या निधनानंतर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे. (Gaurav Kashide Passed Away)
सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुनही गौरवसाठी श्रद्धांजली वाहिली आहे. गौरवने ‘तुमची मुलगी काय करते’ आणि ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाजू सांभाळली. गौरवच्या निधनानंतर लोकप्रिय अभिनेत्री मनवा नाईक हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. गौरवचा एक फोटो पोस्ट करत त्याखाली कॅप्शन देत मनवाने लिहिलं की, “गौरव काशिदे. एक मेहनती तरुण मुलगा जो ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेमुळे आमच्यात सामील झाला आणि ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेत साहाय्य्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली.
पुढे तिने लिहिलं आहे की, “वयवर्षे २६. त्याने बाईक घेतली आणि आयफोन मिळाल्यानंतर तर तो खूप खूश झाला होता. तो त्याच्या कुटुंबातील असा मुलगा होता जो बदल घडवून आणणार होता. १० जून, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोस्ट पॅकअप जेव्हा आम्ही मुंबईकर पावसाच्या आगमनाचा आनंद लुटत होतो. त्यावेळी गौरवने वाकोला पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या एका खासगी बसला धडक दिली. यावेळी तो गंभीर जखमी झाला. आणि त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. आयसीयूमध्ये जवळपास १० दिवस त्याला मृत्यूशी संघर्ष करावा लागला पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. आणि आम्ही गौऱ्या गमावला”.
“पोलिसांनी खासगी बसचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. बस बाजूला नसून मध्यभागी उभी असल्याने पोलिसांनी या अपघातासाठी चालकाला जबाबदार धरले. पण मुद्दा काय आहे?. आम्ही गौरव गमावला”, असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी गौरवला श्रद्धांजली वाहिली आहे.