‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असून या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. आजवर या मालिकेच्या हटके कथानकाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. याशिवाय मालिकेतील पात्रांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. जुई सायली या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचली आहे. सायली या पात्रामुळे जुईला प्रेक्षकवर्ग चाहताना दिसत आहे. (Jui Gadkari Video)
जुईने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याआधी जुईची ‘पुढचं पाऊल’ ही मालिका विशेष गाजली. सोशल मीडियावर ही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. याशिवाय जुई तिच्या शांत, संयमी स्वभावामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे. तसेच अभिनयाशिवाय जुईला गायनाचीसुद्धा आवड आहे. अधूनमधून ती गाणं गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करत असते.
अशातच जुईने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये जुई गाणं गाताना दिसत आहे. मात्र यावेळी जुई एकटीच गाणं गात नसून तिच्या जोडीला तिचे काकाही गाणं गात आहेत. “काका पुतणी प्रेम”, असं कॅप्शन देत काका बरोबर जुगलबंदी करतानाचा सुंदर असा व्हिडीओ जुईने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनीही ‘जाने जा’ या गाण्यावर सूर धरला आहे. एकमेकांना साथ देत काका पुतणीने हे सुंदर असं गाणं गायलं आहे.
जुईच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देत लाईक्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवरुन जुई तिच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह एन्जॉय करत आहे. कुटुंबाला वेळ देतानाचा जुईचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.