‘ठरलं तर मग’ मालिका ही गेली अनेक वर्ष सुरु असून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांनी आणि मालिकेच्या कथानकाच्या अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. सायली-अर्जुनमध्ये अलगद फुलत जाणार प्रेम पाहणं साऱ्यांना रंजक ठरत आहे. मात्र अद्याप दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली काही दिलेली नाही. (Tharal Tar Mag 500 Episode Celebration)
मालिकेत सध्या वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळत आहे. सायलीने अर्जुनच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा केली असून उपवासही धरला आहे. तर बायकोने निर्जळी उपवास धरला म्हणून अर्जुननेही तिच्यासाठी उपवास धरला आहे. अगदी काहीही न खाता पिता त्याने हा उपवास ठेवला आहे. इतकंच नव्हे तर बायकोबरोबर त्याने वडाची पूजाही केली आहे. मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना आणि टीआरपीमध्येही मालिका अव्वल स्थानावर असताना आता या मलिकने तब्बल ५०० भागांचा टप्पा पार केला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर नुकताच ५०० भाग पूर्ण झाल्याबाबत खास सेलिब्रेशन करण्यात आले आहे. यावेळी मालिकेतील कलाकारांनी उपस्थित राहून केकही कट केला. या सेलिब्रेशनवेळी मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकरही उपस्थित होत्या. साऱ्या कलाकारांनी मिळून हा आनंद साजरा केला आहे. कलाकारांनी अगदी दंगा व कल्ला करत हा आनंद साजरी केला.
यावेळी सुचित्रा यांनी मालिका सुरु झाली तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून ही टीम आहे आणि आजही उत्तम काम करतेय, असं म्हणत त्यांनी संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबरोबर पडद्यामागे दिसणाऱ्या मंडळींनीही केक कट केला. सेलिब्रेशनला अर्जुन, चैतन्य, रविराज, प्रताप, महीपत ही कलाकार मंडळी दिसली यावरुन मालिकेत कोर्टाचा सिक्वेन्स येणार असल्याचं कळत आहे.