मालिका म्हटलं की सासू-सूना या आल्याचं. मध्यंतरीच्या काळात या सासू-सूनांमधील भांडण, त्यांच्यातील हेवेदावे, अबोला, राग हे सारं काही छोट्या पडद्यावर पाहायला मिळायचं. आधी ही सासू-सूनांमधील ही भांडण विकोपाला गेलेली पाहायला मिळाली. मालिकेचा विषय कौटुंबिक असला तर हे आलंच म्हणून समजा. मात्र बदलत्या काळानुसार सासू ही सूनेची मैत्रीण, आई दाखवून हे चित्र पालटलेलं पाहायला मिळालं. बऱ्याच अशा मालिका आल्या ज्यात सासू-सूनांचं खास बॉण्डिंगही पाहायला मिळालं. (Punha Kartavya Aahe Serial Troll)
मात्र आता टेलिव्हिजन विश्वात पुन्हा हे चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेच्या सुरवातीला दाखवण्यात येणाऱ्या कथानकाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेत आलेल्या ट्विस्टनंतर मात्र आता नेटकऱ्यांनी मालिकेला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
मालिकेत आकाश व वसुंधरा यांचा पुनर्विवाह दाखवण्यात आला आहे. नुकतंच त्यांचं लग्न झालं आहे. मात्र हे दुसरेपणाचं लग्न आकाशच्या आईला पसंत नसतं. शिवाय वसुंधराचा मुलगाही तिच्याबरोबर घरी आला असल्याचं त्यांना पटलेलं नसतं. लग्न झाल्यानंतर आकाशच्या आईकडून वसुंधराचा छळ करण्यात आलेला पाहायला मिळत आहे. सासू कमी छळ करत आहे म्हणून तिची नणंददेखील यांत सामील झाली आहे. नणंद सासूला वसुंधराबद्दल भडकवतानाही दिसत आहे. एकूणच हे कटकारस्थान, ड्रामा यांचा अतिरेक पाहून आता मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली आहे.
वसुंधराच्या लेकाची फी आकाशने भरली हे तिच्या सासूला कळताच ती वसूला खूप सुनावते. आणि पैशासाठी आकाशशी लग्न केलं असल्याचं बोलते. हे ऐकून वसू आकाशचे सगळे पैसे परत करते. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट करत, “कधी चांगलंही दाखवा. असं असेल तर लग्न न करता सुखी होती म्हणायची. सुखाचा जीव दुःखात घालायचा आणि मुलाला ही हिणवून घ्यायचं”, “लोकांच्या आयुष्यात आधीच टेन्शन आहे, त्यात तुम्ही अजून नकारात्मकता दाखवा”, “टिपिकल सासू-सून ड्रामा”, “सगळ्या घरात नकारात्मकता पसरवतात. सारखे वाद व नकार त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते”, असा अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.