‘क्लासमेट्स’, ‘श्रीदेवी प्रसन्न’, ‘ओले आले’, ‘झिम्मा’ अशा गाजलेल्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत कमी वयापासून त्याने सिनेविश्वात काम करायला सुरुवात केली. त्याने ‘अग्निहोत्र’ मालिकेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अशातच आज सिद्धार्थचा वाढदिवस आहे आणि सिद्धार्थच्याअ वाढदिवसानिमित्त त्याची बायको मिताली मयेकरने त्याला खास पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
मितालीने सिद्धार्थबरोबरचे हटके फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मितालीने सिद्धार्थच्या राशीचा उल्लेख करत त्याला असं म्हटलं आहे की, “मी आजवर भेटलेल्या सर्वात Gemini व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वर्षी तुझ्याबरोबर नवीन साहसाची जंगली सफर असते, जी प्रेम, हास्य आणि अधूनमधून भयानक, मूर्ख विनोदाने भरलेली असते. तू माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या हसण्याचे कारण आहे. मी तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही”.
तसेच यापुढे तिने “हे प्रेम, हास्य, जगभरचा प्रवास आणि अविस्मरणीय क्षणांचे आणखी एक वर्ष आहे. माझ्या प्रिय सिद्धार्थ, तुला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा”. मितालीच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी लाईक्स वव कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी सिद्धार्थला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. मितालीच्या या पोस्टवर सिद्धार्थने हटके कमेंट करत उत्तर दिले आहे. मितालीच्या या पोस्टवर सिद्धार्थने एका जाहिरातीच्या शीर्षक ओळीचा संदर्भ देत कमेंट केली आहे.
यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “जेमिनी असेल घरी, तर Happiness ची चिंता Don’t Worry”. दरम्यान, सिद्धार्थ-मिताली हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी आहेत. त्यांची सोशल मीडियावरील केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडते, त्यामुळे त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसते. अशातच मितालीने सिद्धार्थसाठी लिहिलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधत असून सिद्धार्थने त्यावर केलेली हटके कमेंटही सर्वांना आवडली आहे.