अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सौंदर्याने व सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या दिसण्याबरोबरचं त्यांच्या अभिनयानेदेखील चाहते त्यांच्यावर फिदा आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरुन प्रेम केलं. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचं नाव कलाविश्वात आदराने घेतलं जातं. मृणाल यांचा मुलगा विराजस आणि सून शिवानी रांगोळेदेखील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. मृणाल आपल्या कामामधून वेळात वेळ काढून कुटुंबालाही तितकाच वेळ देतात. (Mrinal Kulkarni Wedding Anniversary)
इतकंच नव्हे तर त्या सोशल मीडियाद्वारे पती, मुलाबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. पती रुचिर यांच्याबरोबरचे बरेच फोटो मृणाल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. मात्र सगळ्यांच्या लाडक्या असणाऱ्या मृणाल यांनीही लव्ह मॅरेज केलं आहे हे अनेकांना ठाऊक नसेल. फक्त ११वी मध्ये असताना त्या त्यांच्या पतीच्या प्रेमात पडल्या होत्या आणि प्रपोज न करता त्यांनी कबुलीही दिली होती.
१९९०मध्ये मृणाल यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. वयाच्या १९व्या वर्षी मृणाल यांनी लग्न केलं. मृणाल-रुचिर यांच्या लग्नाला ३४ वर्ष झाली आहेत. मृणाल-रुचिर यांचं एकमेकांवर तितकंच प्रेम असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतं. अशातच आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमधून त्यांनी त्याचे पती रुचिर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“त्याला फोटो बिटो आवडत नाहीत. तिला फोटो बिटो आवडतात. वर्षानुवर्ष अनेक बाबतीत हे असंच चालू आहे आणि वर्षानुवर्ष हे असंच चालू राहणार कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. आता फोटोंचा क्रम तुम्हीच ठरवा बुवा. १० जून २०२४”, असं कॅप्शन देत त्यांनी नवऱ्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन मृणाल यांना फोटोची आवड असून त्यांचे पती रुचिर यांना फोटोची आवड नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. “समाधानी माणसाचा सदरा आहे त्याचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशी कमेंट नीलकांती पाटेकर यांनी केली आहे.