ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जातात. नीना यांनी नेहमीच विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवला आहे. ‘थोड़ा है थोड़े की जरूरत है’, ‘ये हैं मोहब्बते’ या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. तर ध्यानीमनी, हमिदाबाईची कोठी, छापा-काटा, वाडा चिरेबंदी या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नीना या नेहमीच त्यांच्या परखड व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असतात. (Neena Kulkarni)
सोशल मीडियावरही नीना बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच नीना यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे पती दिलीप कुळकर्णी यांची आठवण काढलेली पाहायला मिळत आहे. नवऱ्याची आठवण काढत त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्याही पसंतीस पडला असून प्रेक्षकही कमेंटद्वारे दिलीप यांची आठवण काढताना दिसत आहेत.

नीना या व्हिडीओमध्ये मासे बनवताना दिसत आहेत. खेकडे, पापलेट आणि कोळंबी त्या घेऊन आल्या असून त्यांनी खास बेत केलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी बोलताना त्यांचे पती दिलीप यांची आठवण काढली आहे. “आज आमच्याकडे बाजार आलेला आहे. आम्ही पावसाळ्याच्या आधी हा बाजार घेऊन आलेलो आहोत. माझे मिस्टर दिलीप कुळकर्णी यांना बाजारात जाऊन चिंबोरी, कोळंबी आणायला अतिशय आवडायचं. आणि अर्थात पापलेट आमच्याकडे नेहमीच असतं. दिलीप हे सर्व आणायला स्वतः बाजारात जायचे आणि आल्यावर स्वतः वाटण करुन बनवायचे. आणि खरंतर त्यांनीच मला हे सर्व बनवायला शिकवलं. आज आम्ही ते करणार आहोत”.
पुढे त्या म्हणाल्या आहेत की, “आज दिलीपची खूप आठवण येत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही घरी बाजार आणतो तेव्हा त्याची खास आठवण येते. आणि त्याच्या आठवणीत आम्ही बनवत असतो आणि खात असतो. त्याला चिंबोरी, कोलंबी विशेष आवडायची. तर दिलीप आज असा काही खास दिवस नाही पण तरी हे तुझ्या आठवणीत आणलं आहे. तुझी आठवण नेहमीच येत असते”, असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्या चिंबोरीचं कालवण करताना दिसत आहेत.