अभिनेते अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, समीर सोनी, सलमान खान, महिमा चौधरी, दिव्या दत्ता, रिमी सेन आणि इतर कलाकारांच्या भूमिका असलेला ‘बागबान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून लावली होती. या चित्रपटात एक लहान मुलगा होता, ज्याचे नाव राहुल असे होते. त्याने अमिताभ बच्चनच्या नातवाची भूमिका केली होती. आज हा राहुल खऱ्या आयुष्यात काय करतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Baghban Movie Child Actor)
२००३ मध्ये, रवी चोप्रा दिग्दर्शित आणि बीआर चोप्रा आणि इतरांनी लिहिलेला ‘बागबान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली. या चित्रपटाने तब्बल ४३ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. आजही या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. अमिताभ बच्चन यांचा चष्मा चपलांच्या पैशातून दुरुस्त करणारा तो छोटा राहुलही सर्वांना आठवत असेल. आता हा राहुल मोठा झाला असून तो काय काम करतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसणारा राहुल मल्होत्रा उर्फ यश पाठक या चित्रपटामुळे साऱ्यांच्या पसंतीस उतरला होता. प्रेक्षकांनीही त्यांच्या या भूमिकेवर भरभरुन प्रेम केले. राहुल अर्थात यश पाठकने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. यामध्ये ‘गंगाजल’, ‘राहुल’, ‘पर्वण’ या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यश पाठक हा आता अभिनेता नाही. लहानपणी अनेक चित्रपटांमधुन महत्त्वपूर्ण भूमिका केल्यानंतर यशने मोठे झाल्यानंतर अभिनय सोडून स्वतःचे एक विश्व निर्माण केले.
आज यश पाठक संगीतकार व संगीत निर्माता म्हणून सिनेसृष्टीत काम करत आहे. सोशल मीडियावर यश बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांचे अपडेट्स तो देत असतो. यश पाठक याने एआर रहमानबरोबर कोक स्टुडिओमध्ये काम केले आहे. त्याने स्वतः रील शेअर करुन याबाबत माहिती दिली. यश पाठक यांचे स्वतःचे युट्युब चॅनल आहे. युट्युब चॅनेलद्वारे तो नेहमीच आपली गाणी प्रेक्षकांसह शेअर करत असतो.