नाटक, चित्रपट, मालिका अशा मनोरंजनाच्या प्रांगणात मुक्तपणे मुशाफिरी करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. सिनेसृष्टीत अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर व नकारात्मक भूमिकांनीदेखील त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत. अशोक सराफ यांचे मराठी मनोरंजन सृष्टीतील योगदान हे वाखणण्याजोगे आहे यात काही शंकाच नाही.
अशोक सराफ यांच्या नाट्यक्षेत्रातील या भरीव योगदानाबद्दल त्यांना यंदाच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांच्याबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या गेली कित्येक वर्ष नाट्यसृष्टीची अविरत सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत आता या दोन्ही कलाकारांना यावर्षीचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई च्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले.
नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.
आणखी वाचा – पारू-हरीशचा साखरपुडा संपन्न, दिशा-दामिनीची नवी चाल, किर्लोस्कर कुटुंबाचं नाव धुळीला मिळणार?
दरम्यान, या पुरस्कारची घोषणा होताच सर्व स्तरातून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. येत्या १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा-माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.