‘माकडाच्या हाती शँम्पेन’, ‘काटकोन त्रिकोण’ अशा नाटकांपासून ‘बालक पालक’, ‘फू बाई फू’, ‘शेजारी शेजारी’ आदी चित्रपटांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे आनंद इंगळे. आजवर आनंद इंगळे यांनी अनेक विनोदी कार्यक्रम व प्रहसनामधून वेगवेगळ्या भमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत असणारे आनंद इंगळे त्यांच्या वैयक्तिक मतांमुळेही चांगलेच चर्चेत असतात.
अशातच त्यांनी नुकतीच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्रम्हणे’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना सोशल मीडिया व त्याचा केला जाणारा वापार, तसेच कलाकारांच्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे आनंद इंगळे यांनी अगदी रोखठोक व थेट उत्तर दिले. दरम्यान, आनंद इंगळे हे त्यांच्या आगामी ‘नकळत सारे घडले’ या नाटकामुळे चांगलेच चर्चेत आहेत.
यावेळी आनंद इंगळे यांनी उत्तर देत असं म्हटलं की, “सोशल मीडियावर मी माझ्या चित्रपट किंवा कामाव्यतिरिक्त काहीही करत नाही. मी माझ्या खासगी गोष्टी शेअर करत नाही, ज्यांची लायकी नाही त्यांनी माझ्यावर का बोलावं?. मी काय केलं आहे किंवा काय केलं नाही हे ज्यांना माहीत नाही, त्यांनी बोलू नये. माझ्या कामाविषयी ५०० टक्के बोलावं. याबद्दल माझा काहीही प्रश्न नाही.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “तुम्हाला माझं काम आवडलं नाही तर तुम्हाला ते सांगण्याचा अधिकार आहे. कारण मी ते सोशल मीडियावर टाकलं आहे. सोशल मीडिया म्हणजे एक दुधारी तलवार आहे आणि ती वापरावी कशी हे मला अजूनही जमलेलं नाही. ज्यांना येतं त्यांच्याविषयी मला काहीही समस्या नाही.”
तसेच ट्रोलिंगबद्दल आनंद यांनी असं म्हटलं की, “एखाद्या अभिनेत्रीच्या फोटोला किंवा तिने शेअर केलेल्या फोटोखाली ज्याप्रकारच्या घाणेरड्या कमेंट्स असतात, ते बघून मला वाईट वाटतं. अर्थात काही चांगल्या कमेंट्सही असतात. मला हे बघून असं वाटतं की हे काय आहे?. आपली वैयक्तिक मते हे समोरच्या माणसासारखी नसतील तर आपण नालायक आहोत असं धरून चालत आहोत. मी एखाद्या विशिष्ट गोष्टीला, एखाद्या विशिष्ट नेत्याला मानत नसेल तर मी दुसऱ्यांच्या दृष्टीने नालायकच आहे असं वाटतं आणि मग लगेच याला बॉयकॉट करा हे सुरु होतं.”