गेल्या काही दिवसांत राखी सावंत अधिक चर्चेत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ती नेहमी काही ना काही करत चर्चेत असते. अशातच आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत सध्या एका मोठ्या अडचणीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व चाचण्या झाल्यानंतर राखी सावंतला यूटीएस ट्यूमर असल्याचे आढळून आले. रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राखीच्या तब्येतीबाबत तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने माहिती दिली होती. (Rakhi Sawant On Health)
यानंतर राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, ती बाहेर जाणं मिस करत आहे. तसेच पूर्ण कपडे घालण्याची तिला सवय नाही त्यामुळे ती हॉस्पिटलचे कपडे घालायला तिला आवडत नाही. आणि लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचंही सांगितलं.
शस्त्रक्रियेपूर्वीच राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी हॉस्पिटलमध्ये बेडवरुन वाईट रीतीने रडताना दिसत आहे. राखी तिचे पोट घट्ट धरुन रडत आहे. राखी सावंतवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे चाहते राखीसाठी सतत प्रार्थना करत आहेत.
या व्हिडीओद्वारे राखी असं बोलताना दिसत आहे की, “अखेर ती स्टेज आली आहे. मी ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे. आजवर मी खूप मोठ्या संकटांचा सामना केला आहे. कृपया सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. हे खूप दुःखद आहे. माझा विश्वास आहे की, मी लवकर बरी होईन. माझ्या शरीरात असणाऱ्या ट्युमरला डॉक्टर बाहेर काढतील. आणि मी पुन्हा नाचू, गाऊ लागेन”, असं ती बोलताना दिसत आहे.