‘ड्रामा क्वीन’ आणि ‘बिग बॉस’ स्पर्धक म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतला दोन दिवसांपूर्वी छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर काल (१५ मे, बुधवार) राखीचा पूर्व पती रितेश कुमारने तिच्या प्रकृतीबद्दलची माहिती देत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने राखीच्या अँजिओग्राफीची तयारी सुरू असल्याचे सांगितले. तसेच राखीची प्रकृती अजूनही गंभीर असून राखी लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांनाही रितेशने आवाहन केले.
‘नवभारत’च्या वृत्तानुसार, राखी सावंतच्या तब्येतीची माहिती देत रितेश कुमार असं म्हणाला की, “राखीच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. मंगळवारपासून आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. मंगळवारी रात्री तिच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या. यामुळे तिला हात वर करणेदेखील तिला शक्य होत नव्हते. तसेच, तिच्या छातीच्या मध्यभागी वेदना होत आहेत”.
अशातच आता रखीचा दुसरा पुर्वपती आदिल खानने एक व्हडीओ शेअर करत राखी हे सगळं ढोंग करत असल्याचं म्हटलं आहे. ‘विरल भायानी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओद्वारे त्याने राखी स्वत:ला तुरुंगात जाण्यापासून वाचवत असून हे सगळं तिचे नाटक असल्याचा दावा केला आहे.
आणखी वाचा – लेकाला शाळेतच न पाठवणारी आई, १३ वर्षांचा मुलगा शाळेत न जाता कसं घेतो शिक्षण?, थक्क करणारा संपूर्ण प्रवास
या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी गेले दोन दिवस बातम्यांमध्ये बघत आहे की, राखीची तब्येत बिघडली आहे. तिला हृदयासंबंधित काही आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिचा पती रितेश कुमार असं म्हणत आहे की, डॉक्टरांनी तिला कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. पण मी एका वर्षांपूर्वी राखीच्या सगळ्या तपासण्या केल्या. इतकंच नव्हे तर मी तिची एक शस्त्रक्रियादेखील केली होती. तेव्हा तिची तब्येत पूर्णपणे चांगली होती”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “आता कोर्टाची तारीख जवळ आली आहे. त्यामुळे हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो असं मला वाटत आहे. कोर्ट आणि लोक हे सगळं पाहत आहेत, पण ती खरंच आजारी असेल तर तिच्यासाठी मी प्रार्थना करतो. मी एक चांगला माणूस म्हणून कुणाचे वाईट इच्छित नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो. सुनावणीला ४ आठवडे उरले आहेत आणि आता तुम्हाला खरंच बरं वाटत आहे की नाही माहीत नाही. पण याबद्दल डॉक्टरांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.”