छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. मालिकेतील ही लीप प्रेक्षकांना आवडत असून मालिकेच्या या नवीन वळणाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस अप्पी व अर्जुन यांची भेट होत नव्हती. पण अखेर आता अप्पी व अर्जुन एकमेकांसमोर आले असून त्यांची भेट झाली आहे. या भेटीत अमोलविषयी त्यांच्यात बोलणं झालं असून अर्जुनला सिंबा हा त्यांचाच मुलगा असल्याचे अजून समजलेले नाही.
मालिकेत आतापर्यंत झालेल्या भागामध्ये गायतोंडे अपर्णाला सांगतात की, “तुम्ही दोघं शिकलेले आहात. सुशिक्षित आहात तुम्ही दोघांनी एकत्र यायला पाहिजे आणि तुमचा आतापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही दोघांनी एकत्र एकमेकांशी बोलायला हवं”. अशातच मालिकेच्या एका नवीन प्रोमोमध्ये अर्जुन अप्पीला भेटायला जातो. पण तो तिच्याविषयी काहीतरी गैरसमज करुन घेतो. या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी एकाने “बंद करून टाका ही मालिका” असं म्हटलं आहे, तर आणखी एकाने “दाखवण्यासारखं काही नसेल तर बंद करा मालिका. एवढ्या मोठ्या हुद्दावर असणारे अधिकारी बिनडोकसारखं वागत नाहीत” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एकाने “एक पोलिस आणि एक कलेक्टर दाखवली आहे, एवढं शिक्षण पण विचार तेच जुनाट आणि रटाळ. बंद करा ही मालिका, उगाच काहीही दाखवू नका” अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, काहींनी या प्रोमोखाली मालिकेतील अर्जुन या पात्राबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. सात वर्षांच्या लीपमुळे व अमोलच्या एंट्रीने या मालिकेला एक नवीन वळण आलं होतं. त्यामुळे मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत होती. मात्र मालिकेचा हा नवीन प्रोमो चाहत्यांना आवडला नसून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.