अभिनेता गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधून कायमचा निरोप घेतला असल्याचं समोर आल्यापासून तो चर्चेत आला आहे. अभिनेत्याने स्वतःच याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली. तेव्हापासून चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. तर सध्या गौरव मॅडनेस मचाऐंगे या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोमध्ये तो कुशल बद्रिके व हेमांगी कवीबरोबरच्या स्कीटदरम्यानचे व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच गौरवने शेअर केलेल्या एका व्हिडीओ क्लिपवर एका नेटकऱ्याने त्याला डिवचलं आहे. (Gaurav More Angry On Netizen)
नेटकऱ्याने कमेंट करताच गौरवनेही त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं की, “रानू मंडल झाला आहे बिचारा गौरव, फेम मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला. त्याला वाटलं ऑनलाइन फॅन त्याचे चित्रपट बघतील, शोचा टीआरपी वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळंच होताना दिसत आहे. पुढे पण दिसत राहणार. एका पॉइंटला सगळं हातातून जाणार. चांगला अभिनेता होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुकरट विनोद मारताना बघून, भोजनेचं पण तसंच झालं. नशिबात जे लिहिलंय ते होणारच”. नेटकऱ्याच्या या कमेंटवर गौरवने प्रतिउत्तर देत असं म्हटलं आहे की, “आधी स्वतःच्या अकाउंटवरून बोला, मग आमच्याबद्दल बोला, बाकी गरमी एन्जॉय करा”.
गौरवच्या उत्तरावर तो नेटकरी कमेंट करत त्याला आणखी ट्रोल करु लागला. नेटकरी पुन्हा कमेंट करत बोलला, “मग हे अकाउंट कोणाचं आहे?, स्वतःच्या अकाउंटने म्हणजे नक्की काय असतं?. स्वतःचं नाव मेंशन असलेलं अकाउंट? म्हणजे नाव बघून रिप्लाय देणार की खरा फोटो बघून त्यावर कमेंट करणार?”, असं म्हटलं आहे. या संभाषणात गौरवची त्याच्या चाहत्यांनी बाजू घेतली. त्यावर तो नेटकरी म्हणाला, “अरे लेका, तू नक्की कोणाच्या बाजूने बोलत आहे? माझ्या की महाराज गौरवादित्य? मराठी माझं चांगलं आहे असं म्हणतोस आणि तू स्वतःचं हिंदीत बोलत आहेस. मग मी जज करणारच ना. जर हा मराठीपेक्षा हिंदीला महत्त्व देत असेल तर बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड”.

नेटकऱ्याने फिल्टरपाड्याचा गुंड असं म्हणताच गौरवचा पारा चढला. गौरव नेटकऱ्याला सुनावताना म्हणाला, “अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाही आहे. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चक्कर मारा फिल्टरपाड्याला. सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?”. गौरवच्या या उत्तरानंतरही तो नेटकरी शांत राहिला नाही. आणि कमेंट करत गौरवला सुनावू लागला.