स्पष्टपणे भाष्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे हेमांगी कवी . ट्रोलर्सच्या प्रश्नांना सडेतोडपणे उत्तर देत हेमांगी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर हेमांगी बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर हेमांगीचा खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. तसेच ती नेहमीच रील-व्हिडीओ शेअर करताना दिसते. या रील व्हिडीओवरुन अनेकदा हेमांगीला ट्रोलही केलं गेलं आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती वेळोवेळी नेटकरांच्या ट्रोलिंगला उत्तर देताना दिसली आहे. सध्या हेमांगी ‘मॅडनेस मचायेंगे’ या रियालिटी शोमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. (Hemangi Kavi Emotional)
कुशल बद्रिके व हेमांगी कवीची जोडी या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. नुकताच ‘मॅडनेस मचायेंगे’ या मंचावर ‘मदर्स डे’ स्पेशल विशेष भाग साजरा करण्यात आला. यावेळी हेमांगीने नव्हेतर हेमांगीच्या आईने तिला मदर्स डे निमित्त खास सरप्राइज दिलेलं पाहायला मिळालं. आईने पाठवलेला हा खास व्हिडीओ पाहून हेमांगीला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळतात. हेमांगीने हा व्हिडीओ शेअर करत खास कॅप्शन देत तिने तिच्या आईचे आभार व्यक्त केलेले पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “प्रत्येक आईचं आपल्या मुलांवर प्रेम असतं. ते दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील पण मुल वाढवताना ती जे जे करते ते जगात कुणीच करु शकत नाही पण जेव्हा हिच मुलं मोठी होऊन अभिनय क्षेत्रासारखी जरा हटके वेगळी वाट निवडतात, तेव्हा त्या मुलांबरोबर त्या आईचा ही संघर्ष सुरु होतो. हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा संघर्ष, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, उघडउघड कधीच नाही पण नकळतपणे माझ्यात रूजवलेलं धैर्य, बळ आणि आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरुन आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला. (Screen वर दिसणारं सगळंच scripted नसतं)”.
पुढे तिने लिहिलं आहे की, “Mother’s Day निमित्ताने आज मी तिला सरप्राइज, भेटवस्तू द्यायला हवी होती पण तिनेच ‘मॅडनेस मचायेंगे’च्या ‘Mother’s Day special’ episode मध्ये हा व्हिडीओ पाठवून मला हे सरप्राइज आणि गोड गिफ्ट दिलं. एवढ्या मोठ्या मंचावर पहिल्यांदा माझी मम्मी दिसणार”.