अलका कुबल यांची ‘माहरेची साडी’ हा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. ९०च्या दशकातील या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठत एक नवा इतिहास रचला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाबद्दल आजही चर्चा होताना दिसून येतात.
‘माहेरची साडी’मध्ये अलका कुबल यांनी साकारलेल्या सोशिक मुलगी व सूनेच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. चित्रपटाप्रमाणेच त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ३२ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट आताच्या काळात आला तर या चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री साकारू शकते? याबद्दल अलका कुबल यांनी भाष्य केले आहे.
अलका कुबल यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘माहेरची साडी’च्या रिमेकबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “त्या काळातले चित्रपट आताच्या काळात लोकांकडून किती व कशाप्रकारे स्वीकारल्या जातील हे सांगू शकत नाही. ३२ वर्षांपूर्वी ते चित्रपट चालून गेले. आता काळ बदलला आहे, चित्रपटांच्या कथा बदलल्या आहेत. आताची आपली जीवनशैलीही बदलली आहे. त्यामुळे आता अशा चित्रपटांना यश मिळेल की नाही माहीत नाही.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आता रडारडीच्या नायिका खूप कमी आहेत. फक्त मालिकांमध्ये अशा नायिका असतात आणि त्यांच्या कथाही तशा असतात. पण माझ्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी व अमृता खानविलकर या आहेत. त्यामुळे यापैकी कोणीही ही भूमिका करु शकेल आणि ही भूमिका साकारणं एवढं काही अवघड नाही.”
आणखी वाचा – एकाच हॉटेलमध्ये आहेत अप्पी-अर्जुन, अमोलची त्याच्या वडिलांबरोबर भेट होणार का?, मालिकेमध्ये मोठा ट्वीस्ट
दरम्यान, सध्या अलका कुबल या कलर्स वाहिनीवरील ‘डॉ. निलेश साबळेच्या ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’ या शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याआधीही त्यांनी एका लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.