गुढीपाडवा झाला की, कोकणात सर्वत्र यात्रा व जत्रा सुरु होतात. यानिमित्ताने कोकणात आता सर्वत्रचं उत्साहाच आणि भक्ती-भावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी अनेक चाकरमनी सध्या कोकणात गेले आहेत. असाच एक मराठी कलाकारदेखील जत्रेनिमित्त कोकणात गेला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे निखिल बने. दरवर्षी सणउत्सवानिमित्त निखिल आपल्या गावी कोकणात जातो. अशातच आता तो नुकताच गावच्या जत्रेनिमित्त कोकणात गेला असून याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी तो कोकणात गेल्याचा व्हिडीओ शेअर केला होता, यांमध्ये त्याने ट्रेन व एसटी बसमधून प्रवास करतानाचे पाहायला मिळाले. अशातच निखिलने त्याच्या गावच्या जत्रेचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
निखिलने एक छोटासा व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्याने गावच्या जत्रेची खास झलक शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या पोसरे व कापरे गावची जत्रा खास झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये देवाचा पालखी सोहळा, गावच्या देवाचे नवीन मंदीर तसंच कोकणातील पारंपरिक वाद्यावर गावच्या देवाच्या भेटीची काही खास क्षणचित्रेदेखील पहायला मिळत आहे.
यानंतर कोकणातील प्रत्येक गावात जत्रेनंतर मनोरंजनासाठी आयोजित केला पारंपरिक लोककलाप्रकार नमनचे काही खास क्षण शेअर केले आहेत. यावेळी निखिलने खूप दिवसांनी असं नमन बघितलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. यानंतर निखिलने पोसरे गाव ते त्याचं घर हा प्रवास टेम्पोतून केल्याचेही या व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओला अमेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्याच्या या साधेपणाचे कौतुकही केले आहे. “जमिनीवर पाय असलेला आमचा चिपळूणकर हिरो”, “भावा खूप मोठा हो”, “बने भाऊ तुम्ही किती साधे राहता”, “तुम्ही एवढे साधेपणाने राहणारे असाल, असं खरंच वाटलं नव्हतं”, “साधे सरळ सोपे जीवन” अशा अनेक कमेंट्स करत त्याच्या व्हिडीओखाली त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत.