‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. झील मेहता तिचा बालपणीचा मित्र आदित्यशी लग्न करणार आहे. झील मेहता गुजराती आणि आदित्य उत्तर भारतीय ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं लग्न दोन वैदिक पद्धतीने होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. झील मेहताने अलीकडेच एका मुलाखतीत आदित्यबरोबरच्या तिच्या लग्नाबद्दल आणि प्रेमकथेबद्दल भाष्य केले. यापूर्वी तिचे आई-वडील या लग्नासाठी तयार नव्हते आणि तिने आपल्याच समाजातील कोणत्याही मुलाशी लग्न करावे, अशी इच्छा असल्याचे त्याने सांगितले. (Jheel Mehta On Wedding)
झील मेहता हिने ‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना सांगितले की, ती आणि आदित्य या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार आहेत. लग्नाची तयारी सुरु झाली असून दोघेही खूप उत्साहित आहेत. झीलच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या लग्नात चार-पाच कार्यक्रम असतील, ज्यामध्ये हळदीपासून मेहंदी व संगीत सोहळ्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. पण गंमत म्हणजे झील मेहता व आदित्य यांनी सात ऐवजी दोन फेऱ्या घेण्याचा विचार केला आहे. याचे कारणही त्यांनी सांगितले.
झील मेहता हिच्या म्हणण्यानुसार, ती गुजराती असल्याने आणि आदित्य हा उत्तर भारतीय ब्राह्मण असल्याने दोघेही एक फेरी गुजराती शैलीत आणि दुसरी उत्तर भारतीय शैलीत घेईल. या शाही लग्न सोहळ्यात जोरदार डान्स पाहायला मिळणार असून त्याची तयारीही सुरु आहे. झील मेहता हिने सांगितले की, तिचे व आदित्यचे कुटुंबीय एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, पण नात्याबाबत संकोच होता. झीलच्या पालकांची इच्छा होती की, त्यांच्या मुलीने त्यांच्याच समाजात लग्न करावे. पण नंतर त्यांनी हे लग्न मान्य केले आणि आता आदित्यला जावईपेक्षा ते मुलगा मानतात.
झील मेहताने असेही सांगितले की, ती आणि आदित्य त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांमध्ये अनेक गोष्टी भिन्न आहेत, परंतु कौटुंबिक मूल्ये समान आहेत. झील मेहता व आदित्य यांचा २०२३ मध्ये साखरपुडा झाला होता. करिअरबद्दल बोलायचे झाले तर, झील मेहता आता एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिचा स्वतःचा पार्लर आणि मेकअप ट्युटोरियलचा व्यवसाय आहे. अभ्यासामुळे अनेक वर्षांपूर्वी अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला निरोप दिला होता.