सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. निखळ व्यक्तिमत्त्व व विनोदाने त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी मनोरंजन विश्वातील विनोदाचे बादशाह अशी लक्ष्मीकांत यांची ओळख कायम आहे. त्यांचे आजवर अनेक सिनेमे हिट झाले. मराठीमध्ये अफाट लोकप्रियता मिळालेल्या या कलाकाराने हिंदी सिनेविश्वातही छाप पाडली. घवघवीत यश मिळाल्यानंतर मात्र या अभिनेत्याच्या डोक्यात हवा गेली नाही. लक्ष्मीकांत यांनी कायमच सहकलाकारांनाही सपोर्ट केला. (Sameer Dharmadhikari On Laxmikant Berde)
अभिनेते समीर धर्माधिकारी यांच्या आयुष्यातही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेला सल्ला अमूल्य आहेत. देखणा अभिनेता अशी ओळख मिळवत समीर यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. मराठीपेक्षा समीर यांनी हिंदी सिनेसृष्टीत अधिक काम केलं. त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील एंट्रीला लक्ष्मीकांत बेर्डे जबाबदार ठरले. नुकतीच समीर यांनी ‘इट्स मज्जा’ वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेला सल्ला सांगत त्यांची एक आठवण शेअर केली.
या मुलाखतीत बोलताना समीर म्हणाले, “मी अभिनयाची सुरुवात केली तेव्हा बऱ्यापैकी काम सुरु होतं. पण हवं तसं काम मिळत नव्हतं. तेव्हा लक्ष्मीकांत दादा प्रत्येकवेळी म्हणायचे, तू मराठीत काय करतोय? तुझा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तू चांगला दिसतोस. तुला इथे काम नाही मिळणार. असं म्हणत ते मला दरवेळी सल्ला द्यायचे. तो माणूस ग्रेटच होता. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्या अभिनेत्यांबद्दल त्यांना खूप आपलेपणा वाटायचा. त्यांचं करिअर सेट व्हावं असं वाटायचं. अंकुशबद्दल त्यांना कुतूहल होतं की, तो एक देखणा अभिनेता आहे. माझ्याबद्दलही त्यांची तिचं भावना होती”.
पुढे समीर म्हणाले, “आम्ही कोल्हापुरातून प्रवास करताना प्रत्येकवेळी ते हेच सांगायचे. मी म्हणायचो. दादा नाही ओ. ते म्हणायचे, तुझा प्रॉब्लेम आहे. तू देखणा आहेस. आता नाही, काही वर्षांनी तुला बरी कामं मिळतील. नंतर मी हिंदीकडे माझा मोर्चा वळवला. लक्ष्मीकांत दादांमुळेच मला जे पी दत्ता यांचा कॉल आला. आमचा देखणा हिरो आहे मराठीमधला असं म्हणतं त्यांनी भेट घडवून दिली. आम्ही भेटलो बऱ्याच गप्पा झाल्या. त्यांनतर ते मला म्हणाले, आता जा तिकडे पैशाचं वगैरे बोलून घे. पण मी तो चित्रपट करु शकलो”. नाही”.