‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय चित्रपटात ग्रंथपालाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचं गेल्या वर्षी २१ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झालं. अखिल मिश्रा यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीसह त्यांच्या चाहत्यांना मोठे दु:ख झाले होते. अखिल मिश्रा यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नीवरदेखील दु:खाचा डोंगर कोसळला होता. पतीच्या आकस्मिक निधनामुळे सुझान बर्नर्ट या अतीव दु:खात होती. मात्र आता ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. सुझान अर्जुन हरदासबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.
सुझानने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल सूझानने असं म्हटलं आहे की, “अखिलच्या निधनानंतर मी कामाशिवाय कुणालाच भेटायचे नाही. मी माझ्या घरातच राहायचे. पण गेल्या डिसेंबरमध्ये एका मित्राच्या हाऊसवॉर्मिंग पार्टीत सहभागी होण्यासाठी मी दिल्लीला गेले. तिथेच मी अर्जुनला भेटले. आमच्यात मैत्री झाली आणि हळूहळू जवळीक वाढली. आता आम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत, असं वाटतं जणू काही आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो”.
पतीच्या निधनानंतर सुझानच्या आयुष्यातील आव्हानांबद्दल ती असं म्हणाली की, “आज मी जे काही आहे ते अखिलमुळेच आहे. हे अर्जुनला माहीत आहे. अखिल हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असून अर्जुनला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि त्याची जागा घेण्याचा अर्जुनचा कोणताच हेतू नाही. अखिल हा माझा आवडता होता.” तर अर्जुनने सुझानबरोबरच्या नात्याबद्दल असं म्हटलं आहे की, “आम्ही नुकताच एकत्र वेळ घालवायला आणि एकमेकांना जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. आमचे नाते दीर्घकालीन टिकावे यासाठी आम्ही दोघे विचार करत आहोत”.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सुझान ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’मध्ये दिसली होती. तिने ‘झाशी की रानी’, ‘संस्कार लक्ष्मी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकांमध्ये काम केलंय. त्याशिवाय ‘नो प्रॉब्लेम’, ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि तेलुगु चित्रपट ‘यात्रा २’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.