छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका जितकी सर्वांच्या आवडीची आहे, तितकीच या मालिकेतील पात्रदेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. जेठालाल, दया, बापूजी, भिडे यांसह सोसायटीतील इतर अनेक पात्रांनी चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. यात टप्पू सेनाही मागे नाही. मालिकेसह वैयक्तिक आयुष्यामुळेसुद्धा ही पात्र कायमच लक्षात राहिली आहेत. अशातच काल (१३ फेब्रुवारी) रोजी टप्पू व बबिता अर्थात अभिनेता राज अनाडकट व मुनमुन दत्ता यांच्या साखरपुड्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेची व या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता पाहता सोशल मीडियावर टप्पू व बबिता यांच्या साखरपुड्याचा वृत्ताने अक्षरशः धुमाकूळच घातला. सोशल मीडियासह अनेक माध्यमांमध्ये राज अनादकट व मुनमुन दत्ता यांची नावे ट्रेंडिंगला होती. त्यामुळे सोशल मीडियावर एकीकडे चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात होता, तर दुसरीकडे या दोघांवर अनेक मिम्स व पोस्टद्वारे टीका तसेच ट्रोलिंग केले जात होते. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे आता समोर आले आहे.

राजच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच्या टीमकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले की, “सर्वांना नमस्कार, सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी सांगत आहोत की, तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत”. साखरपुड्याच्या बातमीची सगळीकडेच चर्चा होत असताना, राजची या पोस्टमधून बरंच काही निष्पन्न झाले आहे.
राजकडून या सर्व प्रकरणावर मौन सोडण्यात आले असून या विषयाला आता पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे टप्पू व बबिता यांच्या साखरपुड्याचा बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुनमुन दत्ता व राज अनादकट यांनी काही दिवसांआधी गुजरात येथील वडोदरामध्ये साखरपुडा उरकल्याचं वृत्तदेखील समोर आलं होतं. अशातच आता पुन्हा त्यांच्या साखरपुड्याच्या अफवा सगळीकडे पसरल्या आहेत. मात्र या फक्त अफवाच असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.