सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच तितीक्षा तावडे, पूजा सावंत, प्रथमेश परब या कलाकारांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एका कलाक्षेत्रातील संगीतकाराचं लग्न झालं आहे. अत्यंत साध्या व नोंदणी पद्धतीने संगीतकार यशराज मुखाटे विवाहबंधनात अडकला असल्याचं समोर आलं आहे. यशराजने स्वतःच त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. (Yashraj Mukhate Wedding)
करोना काळात लोकांच्या हास्याचे कारण बनलेला संगीतकार यशराज मुखाटे याला कोणी विसरू शकणार नाही. ‘रसोदे में कौन था’ या मॅशअपच्या माध्यमातून यशराजने करोना काळात घरी बसून आपल्या कलेने सर्वांचे मनोरंजन केले. २८ वर्षीय संगीत कलाकाराने त्याची गर्लफ्रेंड अल्पनासह लग्न केले आहे. यशराज मुखाटे याने याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. यशराजने लग्नाची ही खास पोस्ट शेअर करताच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘रसोडे में कौन था’ या मॅशअपच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवलेल्या यशराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचा पहिला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो व त्याची पत्नी अल्पना त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. यावेळी दोघेही पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाले. लग्नाचा पहिला फोटो शेअर करत यशराज म्हणाला की, आज दोन मोठ्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे अल्पना आणि मी नोंदणी पद्धतीत लग्न केलं. तर दुसरी म्हणजे माझं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे, ‘मन धागा’. याची लिंक बायोमध्ये दिली आहे. या दोन्ही गोड बातम्या जाहीर करत यशने त्याच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राइज दिलं आहे.
यशराजच्या लग्नाची पोस्ट पाहता शेहनाज गिल, सुप्रिया पिळगांवकर, क्रांती रेडकर, अर्चना निपाणकर, कुशा कपिला, आदिती राव, मिथिला पालकर, दिप्ती देवी अशा अनेक कलाकारांनी यशराज व अल्पनाला शुभेच्छा दिल्या आहेत. शहनाज गिलचा ‘बिग बॉस’ मॅशअप ‘मेरी कोई फीलिंग नहीं’ लाही यशराज मुखाटे यांने त्याच्या संगीत कौशल्याने लोकप्रियता मिळवून दिली.