‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायिका प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी या रिऍलिटी शोमधून त्यांचा गायनक्षेत्रातील प्रवास सुरु केला. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या गायनाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्यांच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. महाराष्ट्राबाहेरही ही जोडी चाहत्यांच्या प्रेमापोटी गायनसेवेसाठी सदैव तत्पर असते. अशातच दोघांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन डोंबिवली येथील एका कार्यक्रमादरम्यानचा खास फोटो शेअर केला आहे. स्वरपौर्णिमा या कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरुन हाऊसफुल बोर्ड हातात घेतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मुग्धाने हाऊसफुलचा आनंद व्यक्त केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी, “आणखी एक हाऊसफुल्ल. काल मी व प्रथमेशने आमच्या लाडक्या म्युझिशियन्स दादांबरोबर डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम सादर केला”, असं कॅप्शन दिलं आहे.
यापुढे तिने लिहिलं आहे की, “नेहमीप्रमाणेच डोंबिवलीकर मायबाप रसिकांनी कालच्या कार्यक्रमाला हाऊसफुल प्रतिसाद दिला. हाऊसफुलच्या बोर्डाबरोबर फोटो काढण्याचं समाधान प्रत्येक कलाकारासाठी खूप मोठं असतं जसं ते आमच्याही चेहऱ्यावर झळकतं आहे. खूप खूप खूप मनापासून धन्यवाद, रसिकहो! लगेचच दुसरीकडे जाण्याची घाई असल्यामुळे रसिकांसह फोटो काढायचे राहिले. पुढच्यावेळी नक्की काढू”, असं कॅप्शन देत म्हटलं आहे.
“आमचं ठरलं म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली. त्यांनतर दोघांनी त्यांचा शाही विवाहसोहळा उरकत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. त्यांच्या लग्नसोहळ्याचे व लग्नपूर्वीच्या विधींचे अनेक फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडले. लग्नानंतर ही जोडी लगेचच कामाला लागली असून ते दौरे करत गायनसेवा करताना दिसले.