सिनेमाच्या पडद्याची शपथ घेऊन सांगतो आज मला मनसोक्त मनमुराद नाचावेसे वाटते. मलाच काय, आपल्या चित्रपटावर बेहद्द प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला अगदी तसेच वाटत असेल. तिकडे दक्षिणेकडील राज्यातील चित्रपट रसिक कशाचीही वाट न पाहता एव्हाना नाचत असतील. घरात नाचत असतील, आर. आर. आर. पाह्यला जाऊन थिएटरमध्ये नाचत असतील, संध्याकाळी क्लब अथवा पबमध्ये जाऊन नाचतील. (Oscars2023)
कारण घडलयं अगदी तस्सेच. तुम्हालाही माहित्येय ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपण दोन ऑस्कर पुरस्कार पटकावलेत. कार्तिकी गोन्सालवीस दिग्दर्शित ‘एलिफन्ट व्हीसपर्स ‘ या लघुपटाने ऑस्कर पुरस्कार पटकावल्याच्या आनंददायक बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होतेय तोच आर. राजमौली दिग्दर्शित ‘आर. आर. आर. ‘ या तेलगू चित्रपटातील ‘नाटू नाटू ‘ या गाण्यालाही ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आणि आनंदात भारी भरच पडली. ऑस्कर सोहळ्यात याच गाण्यावर ज्युनियर एन. टी. आर. आणि रामचरण यांनी लाईव्ह परफाॅर्म केला. त्याला दाद मिळत असतानाच याच गाण्याला ऑस्कर पुरस्कार, एकूणच आजचा दिवस अर्थात १३ मार्च २०२३ हा दिवस आपल्या देशातील चित्रपट रसिकांसाठी नवीन उर्जा देणारा, सकारात्मक दृष्टिकोन देणारा असा आहे. अन्यथा अनेकदा तरी दिवस उजाडतो तो एकाद्या सिनेमावाल्याच्या निधनाच्या धक्कादायक वृत्ताने उजाडतो आणि संपूर्ण दिवस मळभ आल्यासारखे वाटते. अर्थात कोणता दिवस कसा उजडेल हे कोणीच सांगू शकत नाही.

कालचा दिवस एकदम दोन ऑस्कर पुरस्कार घेऊन उजाडेल असे तरी कुठे वाटले होते म्हणा? दीपिका पादुकोण ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर नक्कीच असेल हे आपल्याला माहित होते. ऑस्कर पुरस्कार वितरणात जगभरातील काही सेलिब्रिटीजना स्टेजवर संधी मिळणार त्यात दीपिका पादुकोणचे नाव काही दिवसांपूर्वीच जाहीर झाल्याने तेवढं ग्लॅमरस रुपडं अपेक्षित होतेच. पण आपण भारताचे प्रतिनिधित्व करतोय या भावनेने ती आज ऑस्कर स्टेजवर साडीत वावरली असती तर जगभरातील मिडियाचा तिच्यावरचा फोकस वाढला असता.
दीपिका पदुकोणचा ड्रेस ठरतोय चर्चेचा विषय पण…
ऑस्कर अमेरिकेत आहे, जगभरातील चित्रपट संस्कृतीचा तो सोहळा आहे, अनेक देशांतील फिल्मवाले, अभ्यासक, विश्लेषक तेथे हजर असतात. अनेक देशांत या सोहळ्याचे लाईव्ह कव्हरेज असते, या बहुचर्चित सोहळ्यातील रेड कार्पेट ही देखील एक मोठी न्यूज स्टोरी अथवा फोटो स्टोरी असते. अशा मोठ्या स्टेजवर ‘आपली भारतीय संस्कृती, सभ्यता, परंपरा, मूल्य ‘ दाखवण्याची झक्कास संधी म्हणजे साडीत वावरणे ही होती. ऑस्कर नामांकनात साऊथ इंडियन प्रभाव होता ना, त्यालाच सुसंगत ती साऊथ इंडियन साडीत वावरु शकली असती. एक वेगळीच सेलिब्रिटीज म्हणून तिला प्रचंड दाद मिळाली असती. याच भव्य दिमाखदार स्टेजवर नाटू नाटू हे तेलगू भाषेतील गाणे साकारत प्रादेशिक भाषेतील बाणा जपलाच ना? त्याला दीपिकाचे साडीतील वावरणे सपोर्ट सिस्टीम ठरले असते.

नाटू नाटूचीही खासियत बघा कशी ती? ‘आर आर आर ‘ हा तेलगू भाषेतील चित्रपट हिंदी, कन्नड व मल्याळम या भाषेत डब करण्यात आला. ते करताना कन्नड व मल्याळम भाषेत नाटू नाटूचे भाषांतर (अनुवाद) करण्यात आले. हिंदीत मात्र मूळ नाटू नाटू असेच कायम ठेवण्यात आले. आणि तरीही ते हिंदी चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतले. नाटू म्हणजे नृत्य अर्थात डान्स. हे गाणे डान्स डान्स असे करता आले असते. तसे न करताही तेलगू भाषेतील मुखडा हिंदी चित्रपटात फिट्ट ठरला, हिट्ट ठरला. आता ऑस्कर पुरस्कारानंतर नाटू नाटू गाण्यावरुन मराठीत नाचू नाचू असे अजून कसे केले नाही? एका भाषेतील हिट सुपर हिट गोष्टी अन्य भाषेतील चित्रपटात येणे जाणे (आवक जावक) सुरुच असते. अशी अनेक उदाहरणे हा वेगळाच विषय.
सगळीकडे नाटू नाटू(Oscars2023)
आजच कोणी कोणी विचारत होते, ऑस्करमध्ये मराठी चित्रपटाचे स्थान काय? काही सांगाल का? तर हे घ्या, संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३) ची ऑस्करसाठीची भारतीय चित्रपटसृष्टीची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड होताच मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व माध्यम क्षेत्रात कमालीची सकारात्मक भावना व्यक्त झाली. आणि त्याची गोड गोड फळे आजही मराठी चित्रपटसृष्टीला मिळताहेत. त्यानंतरही परेश मोकशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२०१०) आणि चैतन्य ताह्मणे दिग्दर्शित ‘कोर्ट ‘ (२०१५) या दोन मराठी चित्रपटांनी अशीच छान झेप घेत मराठीत वेगळ्या प्रवाहातील दर्जेदार चित्रपट पडद्यावर येतात हे अधोरेखित केले. या चित्रपटांना ऑस्करच्या विदेशी चित्रपटात नामांकन प्राप्त झाले नाही. असे असले तरी हे सगळे मराठी चित्रपटसृष्टीच्या पथ्यावर पडले.
====
दे देखील वाचा – चंद्रा साकारताना कुशल बद्रिके थेट स्टेज वरून खाली कोसळला.. अमृता आणि ऋतासह अन्य कलाकारांची होती ‘ही’ रिअक्शन
====
यावर्षी ‘मी वसंतराव ‘या चित्रपटाची ऑस्करसाठी स्वतंत्रपणे प्रवेशिका होती. त्याला नामांकन प्राप्त झाले नाही तरी हा प्रयत्न सुत्य होता. मराठीत दर्जेदार थीमवरचे चित्रपट मोठ्याच प्रमाणावर पडद्यावर येतात, जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते दाखल होतात, ते लक्ष वेधून घेतात, त्यांची सकारात्मक चर्चा होते. याचाच एक भाग म्हणून ऑस्कर पुरस्कारासाठी थेट प्रवेशासाठी पावले टाकता येतील असा आपण विचार करु शकतो. मराठी चित्रपट ऑस्करच्या आणखीन जवळ जाईल. चांगला चित्रपट पडद्यावर आणण्यासाठी मोठे बजेट नव्हे तर उत्तम कथाबीज आणि चित्रचौकटीतील बंदिस्त पटकथा हवी.

आणखीन एक आशावाद, नाटू नाटू गाण्यावर ऑस्कर सोहळ्यात परफॉर्मन्स रंगला, असा काही तो एनर्जीक ठरला, खुलला फुलला की स्टॅन्डिंग अव्हेशन अर्थात जबरा रिस्पॉन्स मिळाला. भविष्यात याच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकादी फक्कडबाज लावणी का असू नये? तोही दीर्घकालीन नृत्य प्रकार आहे. त्यातही शैली, स्टॅमिना, शैली, कलाकुसर आहे. नाटू नाटू नाचू शकते, तर मग लावणीही गाजू शकते. त्यात ग्लॅमर आहे, शृंगार आहे, आकर्षकता आहे, स्टाईल आहेच आहे आणि आपणच आपला नृत्य प्रकार जगासमोर नेण्याचे सुचवले नाही तर मग ते कोण सुचवणार?
सगळीकडे नाटू नाटू
‘नाटू नाटू’ वर आता सगळ्याच इव्हेन्टसमध्ये ‘नाचानाच ‘ होणार. जे जे हिट असते, ते ते सगळीकडेच फिट्ट असते. आजच्या ग्लोबल युगातील युथने तर दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटात अशा कॅची गाण्याचा अधिकाधिक शोध सुरु केलाय. त्यासाठी कुठेही जायची गरज नाहीच. मोबाईलवर सगळं उपलब्ध आहे. एका क्लिकवर सगळंच मिळतेय. दक्षिणेकडील रिदम तसा वेगळाच. काहीसा लाऊड. भरपूर वाद्यांचा वापर असणारा.

एक मोठे यश, एक मोठा पुरस्कार बरेच काही साईट इव्हेन्टस घडवतोच. ‘बाहुबली’च्या यशाने साऊथच्या चित्रपटाने डबच्या माध्यमातून जे जे पेरले ते ते नाटू नाटूच्या ऑस्कर पुरस्काराने आणखीन खोलवर रुजवलयं. या पुरस्काराची जगभरातील मिडिया दखल घेणार, त्यावर फोकस टाकणार. त्यातूनच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हाच खरा भारतीय चित्रपट अशी इमेज आकाराला येत हिंदी चित्रपटसृष्टीचे अर्थात बाॅलीवूडचे महत्व दुय्यम तर होणार नाही ना? एकाचे यश, इतरांना चिंता असा हा फंडा आहे. तूर्तास आपण नाटू नाटूवर बेभान होउन नाचू या….आनंद साजरा करायला हवाच. आणि त्यासाठी नाच हवाच.