बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमीवेळा बोलताना दिसला आहे. अर्शदचा विवाह मारियो गोरेट्टी हिच्याशी झाला आहे. त्यांच्या लग्नाला यंदा २५ वर्षे पूर्ण होतील. अर्शद व मारियाचे लग्न १४ फेब्रुवारी १९९९ रोजी झाले. विशेष बाब म्हणजे अर्शद व मारिया यांनी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर लग्न केले. लग्नाच्या २५ वर्षांनंतर लग्नाच्या वाढिदवसानिमित्त दोघांनी एकमेकांना खास भेट दिली आहे. (Arshad Warsi On Wedding)
अर्शद व मारिया यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. एवढा कालावधी लोटूनही या जोडप्याने अद्याप लग्नाची नोंदणी केलेली नाही. त्यांचा २५वा लग्नाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे. अर्शद वारसी व मारिया यांचा विवाह २३ जानेवारीला नोंदणीकृत पद्धतीने झाला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी एका खास संवादात अर्शद वारसी म्हणाला, “लग्नाची नोंदणी करण्याबाबदल माझ्या मनात कधीच आले नव्हते आणि मला त्याची गरजही वाटली नाही. मात्र, मालमत्ता खरेदी करताना हे खूप महत्त्वाचे असल्याचे माझ्या लक्षात आले”.
अर्शद पुढे म्हणाला, “आम्ही हे कायद्यासाठी केले आहे. नाहीतर पती-पत्नी हे एकमेकांशी बांधील असतील तर त्याची काहीही आवश्यकता नाही” असंही तो म्हणाला. त्याचवेळी अर्शदने व्हॅलेंटाईन डेशी संबंधित भयानक आठवणी सांगितल्या. अर्शद हसत म्हणाला, “मला माझ्या लग्नाची तारीख सांगायला आवडत नाही कारण ते खूप विचित्र वाटतं. मारिया व मला दोघांनाही लाज वाटते. आम्ही हे जाणूनबुजून केलेले नाही” असंही तो म्हणाला.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अर्शद वारसी सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत सध्या तो पाहायला मिळत आहे. अर्शद वारसी यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, अर्शद लवकरच संजय दत्तसह एका चित्रपटात दिसणार आहे. मात्र अद्याप तो नेमका कोणत्या चित्रपटात झळकणार, कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणं रंजक ठरेल.