सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे सिनेसृष्टीतील एका लाडक्या जोडीबद्दल बोललं नाही तर कसं चालेल. ही प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे व त्याची पत्नी दीप्ती तळपदे. काही दिवसांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून स्थिरावत श्रेयस ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत जिद्दीने उभा राहिला. यामध्ये त्याची पत्नी दीप्ती हीने श्रेयसला खंबीर साथ दिली. दरम्यान, सगळीकडे श्रेयसच्या बायकोचं कौतुक करण्यात आलं. अशा या आयडॉल असणाऱ्या जोडीचा प्रेमविवाह असून ३१ डिसेंबर रोजी श्रेयस व दीप्तीने लग्नगाठ बांधली. (Shreyas Talpade Lovestory)
श्रेयस व दीप्ती यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली. ते कुठे भेटले, आधी कोणी कोणाला प्रपोज केलं यांसारखे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. नुकतीच श्रेयसने एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ला पत्नीसह हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीचा खुलासा केला. यावेळी बोलताना श्रेयसने म्हटलं की, “केळकर कॉलेजमध्ये मला प्रमुख पाहुणेसाठी निमंत्रण देण्यासाठी दिप्तीचा कॉल आला. तेव्हा मला विचारलं की मला कॉलेजच्या इव्हेंटसाठी तुम्हाला निमंत्रण द्यायचं आहे. मी तुम्हाला कुठे भेटू शकते. हा संपूर्ण संवाद तिने इंग्रजीमधून केला. तेव्हा मी तिला म्हटलं, मी सध्या मढ आयलंडला शूट करत आहे. तिने मला विचारलं कसं यायचं. मी तिला एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा म्हणून बसने कसं यायचं ते सविस्तर सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली की, गाडी घेऊन येणार आहे. हे ऐकून मी शांतचं झालो”.
पुढे तो म्हणाला, “त्यानंतर कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी तिने मला कॉल करुन विचारलं की, तुम्ही कसे येणार आहात. तेव्हा मी तिला आधी म्हटलं बसने येईन. त्यानंतर मला वाटलं की आपण प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहोत, म्हणून मी तिला म्हटलं की, मी रिक्षाने येईन. शेवटी ती मला म्हणाली की, आम्ही कॉलेजकडून गाडी पाठवू. तशी आमची ओळख झाली. मी पहिल्यांदाच तिला या कार्यक्रमावेळी भेटलो. तिचं सर्वांशी वागणं, बोलणं पाहून मी इंप्रेस झालो. आणि ती मला आवडली. आवडली म्हटल्यावर वेळ वाया घालवायचा नाही असं मी मनाशी ठरवून, तिला सांगून टाकायचं ठरवलं”.
लग्नाच्या मागणीबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, “मी दीप्तीला थेट लग्नासाठीच विचारलं होतं. त्यामध्ये कोणताही संभ्रम नव्हता. तिच्या आयुष्यात कोणी असेल किंवा कोणाचा ती दुसऱ्या कोणाचा विचार करत असेल याचा मी विचार केला नाही. मी तिला म्हटलं तू मला आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, अशी थेट मागणी श्रेयसने दीप्तीला घातली होती. मात्र लगेच तिने होकार दिला नाही. जेव्हा मी विचारलं तेव्हा ती तिच्या पुढच्या शिक्षणाचा विचार करत होती. यूएसला जाऊन दीप्ती परदेशात शिक्षण घेणार होती. पण काही कौटुंबिक कारणास्तव तिला जाता आलं नाही. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी आम्ही लग्न केलं”.