अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावरुन बीएमसी कर्मचाऱ्यांबाबत केलेलं वादग्रस्त विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. दरम्यान या प्रकरणावरुन बीएमसी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करताच अभिनेत्याने माफी मागत हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अभिनेत्याच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेकांची मनं दुखावली. अनेक कलाकारांनीही अभिनेत्याच्या या कृतीवरुन रोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला. अशातच पुष्करची वादग्रस्त पोस्ट पाहता ‘बिग बॉस’ फेम अभिजीत केळकरने जाब विचारत पोस्ट शेअर केली आहे. (Abhijeet Kelkar On Pushkar Jog)
अभिजीतने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत, “प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा, तुझी चर्चेत असलेली, वादग्रस्त पोस्ट वाचली, ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती तिच्याबरोबर तिला, तिच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण या कामात अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे, मदत केली आहे. उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात, वरुन आदेश आला की त्याची अंमलबजावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात, ते काही त्यांच्या मनातले नसतात. तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात”.
पुढे त्याने प्रश्न विचारत असे लिहिले आहे की, “घरी आलेल्या अश्या कर्मचारांच्या लाथ घालावी असं तुला का वाटलं असेल? ते सरकारी कर्मचारी आहेत, ते आपलं काम करत आहेत असा विचार तुला करावासा का वाटत नसेल?, आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? अगदी आपण कुठल्याही जातीचे असो तरीही लाज का वाटावी. जात म्हणजे काही आपण केलेले वाईट काम किंवा चोरी नाही ज्याची आपल्याला लाज वाटावी. अभिमान बाळगावा असंही काही नाही कारण त्यात आपले स्वतःचे असे काहीच कर्तृत्व नाही. ती आपणहून आपल्याला येऊन चिकटते, कितीही हवी किंवा नको म्हटली तरीही, बरोबर ना?” असं म्हटलं आहे.

यापुढे तो असंही म्हणाला की, “सर्वेक्षण हा सरकारचा निर्णय आहे. सरकारने काढलेला आदेश आहे, त्यामुळे तुला इतकाच राग आला आहे तर थेट त्यांच्याच लाथ घालावी असं का वाटत नसेल? गेला बाजार, त्यांचं लोकांना हे प्रश्न तू का विचारले नसशील? हल्ली पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे हे सोशल मीडियावर active असलेल्या तुला माहीत असेलच, मग तो राग तिथे त्यांच्यावर का काढला नसशील?, समजून चालू घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाथ घातली असतीस? तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं?” असं म्हटलं.

यापुढे त्याने लिहिलं आहे की, “आपण कलाकार आहोत, लोक आपल्याला रोज बघतात, आपल्यावर, आपल्या कलाकृतीवर अतोनात प्रेम करतात, आपलं बोलणं वागणं फॉलो करतात, त्यामुळे जबाबदारीने वागणं, बोलणं हे आपले कर्तव्य आहे. मी महानगरपालिका शिक्षिकेचा मुलगा असल्यामुळे तू जे बोललास ते मता फारचं लागलं, त्यांचं अतिशय वाईट वाटलं, रागही आला. तू सुज्ञ आहेस असं मला वाटतं, यामुळे आता काय करायला हवं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. ते केलंस तर लोभ आहेच तो तसाच राहील. तुझा मित्र/शुभचिंतक” असं म्हणत समज दिली आहे.