छोट्या पडद्यावरील “सारेगमप लिटिल चॅम्प्स” या सिंगिंग रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके गायक मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आमचं ठरलं म्हणत दोघांनी सोशल मीडियावर एकत्र एक फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर गुडन्यूज शेअर केली होती. त्यानंतर अनेक कलाकार व चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. (Mugdha Vaishampayan On Prathamesh Laghate)
मुग्धा व प्रथमेश हे दोघं एकमेकांना लिटिल चॅम्प्सपासून ओळखत असले, तरी शोनंतर अनेक वर्षांपासून ते एकत्र कार्यक्रम करत आले आहेत. दोघांमधील बॉण्डिंग उत्तम असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याचेही त्यांनी सांगितलंय. मुग्धा व प्रथमेश यांचा ‘मर्मबंधातील ठेव’ हा संगीत कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमानिमित्त ही जोडी सध्या गोव्यात आहे. काल त्यांचा हा संगीत कार्यक्रम गोव्यात पार पडला. दरम्यान कार्यक्रमाची एक झलक मुग्धा व प्रथमेशने इंस्टाग्रामवरून शेअर केली होती.
आज प्रथमेशचा वाढदिवस आहे. प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त तिने थेट गोव्यातून दोघांचा रोमॅंटिक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय मॅन” असं कॅप्शन देत मुग्धाने प्रथमेशसह असलेला फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुग्धाने शेअर केलेली पोस्ट रिपोस्ट करत प्रथमेशने “थॅंक्यू मुग्गा…” असं म्हटलं आहे.


मुग्धा व प्रथमेश यांच्या प्रेमाच्या कबुलीनंतर साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघांची पहिली भेट ही लिट्ल चॅम्प्सच्या मंचावर झाली होती. त्यानंतर बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली. काही दिवसांनी त्यांचा केळवणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यावर मुग्धाही रिऍक्ट झाली होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्यानंतर या दोघांनी आपण इतक्या लवकर लग्न करणार नसल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता.