आजकाल कलाकारांपाठोपाठ आता सोशल मीडिया स्टारचा वावरही सर्वत्र वाढलेला दिसतोय. चाहते ही या सोशल मीडिया स्टारवर भरभरून प्रेम करतात. आज सोशल मीडियावर अनेक स्टार असे आहेत, जे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. यांत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मृणाल दिवेकर. लोकप्रिय मराठी सोशल स्टारसाठी मृणालच नाव आवर्जून घेतलं जात. इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या मृणालने आजवर स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असलेल्या मृणालने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान केलेलं भाष्य प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Social Media Star Incident)
या मुलाखती दरम्यान मृणालने लहान असताना तिच्याबरोबर घडलेल्या एका वाईट प्रसंगाबद्दल भाष्य केलं. एका ट्युशन टिचरने नग्न केलं असल्याचा, धक्कादायक खुलासा मृणालने या मुलाखती दरम्यान केला. याबद्दल बोलताना मृणाल म्हणाली, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं.”
याशिवाय शाळेतील किस्से सांगत मृणाल पुढे म्हणाली, “मी आधी कराडच्या एका शाळेत शिकत होते, तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे,” असाही खुलासा मृणालने केला.
पुढे बोलत मृणाल म्हणाली, “तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती, त्यांचे एक वेगळे सेक्शन बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, पण त्यात तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं सांगायचे,”. कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता. एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत पण त्याच्यात दुसरे गुण असतील तर त्यात त्याला एक्सप्लोर करायला लावणं यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असं मत मृणालने मांडलं.