अभिनेता जय भानुशाली व अभिनेत्री माही भानुशाली हे कपल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. विशेषतः त्यांची मुलगी तारा ही चाहत्यांची फेवरेट आहे. ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. तिच्या क्युटनेसचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या ताराचा एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असून माहीने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Mahi Shared Video With Daughter Tara)
माहीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती ताराचे केस बांधताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलं , “मुलांना आलेला ताप पालकांना त्रास देतो, कधीकधी तो त्यांना घाबरवतोही. जेव्ही गुरुवारी रात्री ताराला खूप ताप आला तेव्हा हा अनुभव मलाही आला. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीनंतर तारा गुरुवारी शाळेत गेली. बहुतेक वेळा ताप इतका गंभीर नसतो पण यावेळी आलेला ताप हा आमच्या तारासाठी खूप गंभीर होता”.
वाचा – व्हिडिओतून माही काय म्हणाली?(Mahi Shared Video With Daughter Tara)
माहीने पुढे लिहीलं की, “आम्ही डॉक्टरांशी चर्चा करून तिला औषध दिलं पण तरीही तिचा ताप उतरला नाही. औषध देऊनही ताप १०४पेक्षा अधिकच होता. ताप उतरत नसल्यामुळे आम्ही थंड पाण्याच्या पट्ट्याही ठेवल्या. तरीही ती तापामुळे कापत होती. मी पुन्हा रात्री १ वाजता डॉक्टरांना कॉल केला. पण आजकाल सगळ्याच मुलांना व्हायरल इन्फेक्शन होत असल्यामुळे डॉक्टरांनी मला काळजी न करण्यास सांगितलं. पण आईचं मन असल्यामुळे काळजीपोटी रात्रभर मला झोप लागली नाही”.
माही पुढे म्हणाली, “शुक्रवारी ताराला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तिच्यावर चाचण्या केल्या आणि तिला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाल्याचं कळलं. या तापाला हलक्यात घेऊ नका आणि मुलांची चांगली काळजी घ्या. या काळात मुलांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे”. असा सल्ला देत तिने ताराच्या प्रकृतीतही सुधारणा असल्याचं चाहत्यांना कळवलं. तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचही तिने सांगितलं.