Mumbai Heavy Rain : गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरातील भागांना पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. विविध भागांमध्ये पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपासून तर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अशातच हवामान खात्याने आणखी काही तास मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अचानक आलेल्या पावसाचा फटका अनेक भागांना बसला. त्याचबरोबरीने मुंबईची लाईफ लाइन लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. तास तासभर एकाच जागी उभं राहण्याची वेळ आली. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मात्र मुंबईतील केईएम रुग्णालयातील परिस्थिती आणखीनच भयावह होती. रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर रुग्णांची तारांबळ उडाली. (Heavy rain Kem hospital)
आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरला. दक्षिण मुंबईतही पावसाची जोरदार हजेरी आहे. अशातच लालबाग, काळाचौकी, परेल, दादर परिसर जलमय झाला. दक्षिण मुंबईत महत्त्वाचं आणि मुख्य केईएम रुग्णालयालाही पावसाचा मोठा फटका बसला. रुग्णालयात पाणी तुंबायला सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. पाणी तुंबताच रुग्णांना काही करावं सुचेना. त्यांनी वॉर्डबाहेर ठेवण्यात आलेल्या बाकावर बसण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – Video : गरम सहन न झाल्याने आई लेकरांना घेऊन थेट एटीएममध्येच झोपली, मस्त एसीमध्ये आराम करत होती आणि…
पाहा व्हिडीओ
रुग्णालयाच्या तळमजल्यापर्यंत हे पाणी पोचलं. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, रेडिओलॉजी डिपार्टमेमटमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली. डॉक्टर व रुग्ण त्यामधूनच वाट काढत होते. डॉक्टरही या सगळ्यामध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. वाढतं पाणी पाहता रुग्णालय प्रशासनाने तुंबलेलं पाणी काढण्यास सुरुवात केली. अजूनही कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयातील पाणी कमी करण्याचं काम सुरु आहे. केईएम रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरु असतात. या परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. तसेच रुग्णांचीही मोठी संख्य असते. आता जोरदार पावसामुळे सगळ्यांचेच हाल झाले आहेत. मेट्रो सिटी समाचारने केईएम रुग्णालयाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्
पहिल्याच पावसात शहरात जलमय वातावरण आहे. पाण्यामधून वाहून येणारा कचरा आणि समोर आलेलं दृश्य खरचं भयावह आहे. काही दिवसांपूर्वीही अचानक आलेल्या पावसामध्ये साकीनाका परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामध्ये फक्त कचराच दिसत होता. आताही शहरातील विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्यात फक्त कचरा आहे. त्यामुळे पावसापूर्वी प्रशासन नक्की काय करत होतं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.