जन्माला आल्यानंतर स्ट्रगल कोणालाही चुकला नाही, असं म्हणत आपण प्रत्येक प्रसंगाचा सामना करतो. बहुदा हाच विचार सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांनी केला असावा. ऋता दुर्गुळेच्या सासूबाई मुग्धा यांनी आयुष्यात दुःखाचा डोंगर अनुभवला. मात्र तितक्याच हिंमतीने या डोंगरावर सुखाची चादरही पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा संपूर्ण प्रवास वर्षानुवर्षे खडतर होत गेला. मुग्धा यांना ना माहेरी प्रेम मिळालं ना सासरी. आईचं सुखही मिळालं नाही. इतकंच काय तर वडिलांनी दुसरं लग्न करताच छळही झाला. लग्न झाल्यानंतर सुख मिळेल अशी आशा असताना सासूबाईंनी हाताला धरुन घराबाहेर काढलं. मुग्धा गरोदर असतानाच त्यांनी हे कृत्य केलं. मुग्धा यांनी त्यानंतरचा पुढचा प्रवास कसा केला? हे ऐकूनच अंगावर काटा आला. (Actress mugdha shah life)
नातेवाईकांकडे बरीच वर्ष राहिल्यानंतर…
मुग्धा लग्नानंतर लगेचच गरोदर राहिल्या. लग्नाच्या दोन महिन्यातच सासूबाईंनी घराबाहेर काढलं. अशावेळी हाती पैसेही नव्हते. त्यांच्या पतीलाही अगदी ६०० रुपयांपर्यंत पगार होता. त्यामुळे घरभाडे भरण्याचीही सोय नव्हती. मग अशावेळी त्या एका लांबच्या नातेवाईकाकडे राहण्यासाठी गेल्या. मनोरंजन विश्व मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मग आमचे खूप लांबचे एक नातेवाईक होते. म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बहिणीचे मामा सासरे होते. आरसीएफ कॉलनीमध्ये आम्ही राहत होतो. मामा सासरेही तिथेच राहत होते. ते दिवसातून पाचवेळा आंघोळ, चारवेळा पूजा, दोनवेळा अग्निहोत्र करायचे. एक छोटा हॉल, छोटा बेडरुम आणि बाल्कनीला किचन केलं होतं. मी त्यांच्याकडे गेले. मी त्यांना बोलले की, मामा तसा तर काय आपला संबंध नाही. पण असं असं झालं आहे. मला थोडे दिवस तुमच्याकडे राहायला द्याल का? असं मी त्यांना विचारलं. ते मला लगेचच हो म्हणाले. काही अडचण नाही तू सामान घेऊन ये असं बोलले. माझं बाळंतपण वगैरे त्यांच्या घरात झालं”.
आणखी वाचा – २०शीत लग्न, गरोदरपणात सासूने घराबाहेर काढलं अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंच्या नशिबी वनवास, सासरीही छळ आणि…
नऊ महिने नऊ दिवस होऊनही डिलिव्हरी झाली नाही
“तरीही मी तिथेच होते. खूप वर्ष मी त्यांच्याच घरात राहिले. त्यांनी माझ्या मुलांना आई-बाप, आजी-आजोबा सगळ्यांचं सुख दिलं. माझ्या मुलांचे प्रत्येक लाड त्यांनी पुरवले. त्यावेळेलाच ते खूप वयस्कर होते. एकटेच असल्यामुळे आधी ते हॉटेलमध्ये जेवायचे. त्यामुळे मला ७.३० वाजता जेवायला वाढायचं असं त्यांनी मला सांगून ठेवलं होतं. नऊ महिने नऊ दिवस होऊनही माझी डिलिव्हरी झाली नव्हती. पण शेवटी हॉस्पिटलला जाईपर्यंतही मी तव्यावरची पोळी त्यांना ताटात वाढत होते. मी निस्वार्थ त्यांच्यासाठी करायचे. त्यांनीही माझ्यासाठी निस्वार्थ केलं. ७.३५ झाले आणि मी जेवण दिलं नाही तर ते चप्पल घालून निघायचे”.
आणखी वाचा – तीन महिन्यांची असताना आई गेली, वडिलांचं दुसरं लग्न, छळ अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंचा वाईट काळ
सासू-सासरे, नणंदा यांचा त्रास
“त्यांनी माझे खूप लाड केले. आधार दिला. त्यावेळी सासू-सासरे, नणंदा यांचा त्रास माझ्या वाट्याला आला. परत मी म्हणते, त्यांचा दोष नाही माझं हे नशिब आहे. मामांना हे सगळं मी सांगायचे. ते बोलायचे घाबरु नकोस मी आहे. तसं बघायला गेलं तर माझ्या नवऱ्याचा मला पाठिंबा नव्हता. कारण तोही आई-बाबा, भावंड असं होतं. लगेच आम्हालाही कुटुंबापासून वेगळं केल्यामुळे तोही त्याच्या जागी बहुदा बरोबर असेल. त्यालाही मी भरपूर दोष दिले. जन्मपासून ते आता या क्षणापर्यंत एकटी काय असते? हे मी अनुभवत आहे. या एकटेपणामधून मी जातेय पण हा आयुष्याचाच एक भाग आहे”. मुग्धा यांनी दुःखाचा डोंगर सर करत मिळवलेलं यश खरंच कौतुकास्पद आहे.