मराठीत आता दमदार चित्रपट प्रत्येक शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांसाठी खरंतर ही मनोरंजनाची धमाल मेजवानीच आहे. अशातच आता आणखी एक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तिथपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आता ‘एप्रिल मे ९९’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जवळपास अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कोकणाऱ्या सुंदर संस्कृतीचं दर्शन घडतं. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक जवळचा ठरेल असं चित्र दिसत आहे. काही मिनिटांमध्येच ट्रेलरला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. (april may 99 marathi movie trailer)
‘एप्रिल मे ९९’साठी एक अभिमानस्पद गोष्टही घडली आहे. ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशीबरोबरच रितेश देशमुख यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. ट्रेलरमध्ये मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांमधील गोडी अनुभवायला मिळत आहे. एप्रिल, मे महिना म्हटलं की अनेकजण कोकणातल्या गावी जातात. गावी अगदी मनसोक्त बागडतात. गावची संस्कृती अनुभवतात. त्याच आठवणींना उजाळा देणारा हा चित्रपट असणार आहे. ‘एप्रिल मे ९९’च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद हे धमाल त्रिकूट दिसत आहे.
आणखी वाचा – Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्…; स्मशानभूमीत पुढे असं काही घडलं की…
या त्रिकूटाची भेट जाईशी होते. जाईला कोकण फिरवत असताना धमाल-मस्ती, मैत्री आणि भावनिक जिव्हाळा ट्रेलरमध्ये दिसत आहे. निसर्गरम्य कोकणचे दर्शनही या निमित्ताने प्रेक्षकांना नव्याने अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक रोहन मापूसकर म्हणतात, “सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जागा व्हॅकेशन्सने घेतली आहे. अर्थात बाहेर फिरायला जाण्यात काहीच गैर नाही. दिवसभर गावात फिरत, विहिरीत डुबक्या मारत, सायकलवर संपूर्ण गाव फिरण्याची मज्जा काही वेगळीच आहे. हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘एप्रिल मे ९९’मध्ये करण्यात आला आहे”.
आणखी वाचा – दीपिका कक्करला गंभीर आजार, लवकरच मोठी शस्त्रक्रिया होणार, नवरा म्हणाला, “विकृतात…”
‘एप्रिल मे ९९’मध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत. तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.