मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. ‘झापूक झुपूक’, ‘थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ सारखे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना विविध कथा अनुभवायला मिळत आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या. अंकुशच्या भूमिकेची अधिक चर्चा पाहायला मिळाली. या चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहरा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर अंकुशसह काम करताना दिसेल.
विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अक्षया मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय. अर्जुन’मध्ये ती अंकुशसह स्क्रिन शेअर करताना दिसेल. ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अंकुश एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर अक्षया यात कोणत्या भूमिकेत दिसणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण अक्षया एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार हे नक्की आहे.
भूमिकेबद्दल अक्षया म्हणाली, ‘’पहिल्याच चित्रपटात दिग्गजांसह काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी या चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाची कथा ऐकून मी यासाठी लगेचच होकार दिला. चित्रपटात दिग्गज कलाकार असल्यामुळे सुरुवातील थोडं दडपण होतं. सहकलाकारांनी सांभाळून घेतल्याने आपसूकच काम चांगलं झालं’’.
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत. विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.